फक्त संशयित आम्हाला ताब्यात घेतलंय. आमच्यावर हा अन्याय असल्याचा संताप व्यक्त करत संबंधित लोकांनी पोलीस स्टेशनमध्येच उपोषण सुरू केले. पारधी समाजाचे दिगंबर काळे यांना ही घटना समजताच त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भोसले यांना कळवले. त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितलं की शनिवारी रात्रीपासून पारधी लोकांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहेत. यात महिला, लहान मुले व पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अनेक लोक भीक मागणारे आहेत तर काही फुगे विकून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्यांना तात्काळ सोडून द्यावे अशी आमची मागणी आहे.
याबाबत कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनीही सोशल माध्यमातून पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. ते म्हणतात, पारधी समाजातील तब्बल १५० जणांना वारीदरम्यान आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून डांबून ठेवण्यात आलेले आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी अनेक पारधी समाजातील स्त्रिया, मुले व पुरुषांना कोणत्या कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे? छोट्याशा जागेत इतक्या जणांना डांबून ठेवल्याने अनेकांचा जीव गुदरमतोय, त्यांना खायला देण्यात आलेले नाही की त्यांना प्यायला पाणी नाही. आळंदी पोलीस स्टेशन झोन एकच्या अखत्यारीत आहे. तेथील एसीपींना माझी विनंती की, इन्स्पेक्टर सुनील गोडसे यांना कायदा हातात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का हे सांगावे. कोणत्या शंकेवरून इन्स्पेक्टर गोडसे यांनी पारधी समाजातील लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात अटक करून ठेवले? त्यांच्यावर गुन्हा नोंदवला का? अश्याप्रकारे मानवी हक्क उल्लंघन करण्याचा गोडसेंना अधिकार दिला कुणी?
पारधी समाजातील बांधवांना केवळ वारीच्या पार्श्वभूमीवर डांबून ठेवणे अन्यायकारक आहे. समाजातील सजग नागरिक, पत्रकारांनी मदत करावी. इन्स्पेक्टर सुनील गोडसे यांना विनंती की त्यांनी डांबून ठेवलेल्या पारधी समाज बांधवाना त्वरित सोडावे, अशी विनंती सरोदे यांनी केली आहे.