दरम्यान, विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व राज्यातील पारंपरिक स्वायत्त महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर स्तरावर बीए, बीकॉम, बीएस्सी, एमए, एमकॉम आणि एमएस्सी; तसेच २० एप्रिलच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या अन्य पारंपरिक अभ्यासक्रमांसह विद्यापीठांशी संलग्नित कॉलेजांतील पदव्युत्तर पदवीचे एमए, एमकॉम आणि एमएस्सी अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार निश्चित केलेल्या क्रेडिट आराखड्यानुसार राबविले जातील. उर्वरित अस्वायत्त संलग्न महाविद्यालयांमध्ये सध्या सुरू असलेले अभ्यासक्रमच राबविले जातील.
राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील ८७ स्वायत्त महाविद्यालये व ५७ व्यावसायिक अशा एकूण १४४ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये ‘एनईपी’ची अंमलबाजवणी केली जाणार आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ‘यूजीसी’ने राज्यातील आणखी ३६ महाविद्यालयांना नव्याने स्वायत्तता दिली आहे. तिथेही या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
उर्वरित महाविद्यालयांसाठी धोरण ३० सप्टेंबरपर्यंत
पुढील वर्षी राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची १०० टक्के अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यापीठांना संभाव्य अडचणींचा आणि उपाययोजनांचा अभ्यास करून धोरणाच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता आणावी लागणार आहे. त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ‘एनईपी’च्या अंमलबजावणीचा अंतिम आराखडा व आनुषंगिक धोरण तयार करावे लागणार आहे. त्यानंतर जानेवारीपासून राज्यात पुढील वर्षासाठी ‘एनईपी’ लागू करण्यात येणार आहे, असा कालबद्ध कार्यक्रम सरकारने निश्चित केला आहे.
‘एनईपी’नुसार पाठ्यपुस्तके मराठीत
राज्यात नव्या शैक्षणिक धोरणात सर्व अभ्यासक्रम मराठीत आणण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यानुसार यंदा पदवीच्या वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाची काही पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही पुस्तके तयार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा पदवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा अभ्यास मराठीतही करता येणार आहे.