मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथील अक्षय किसनराव देशमुख हा १९ वर्षीय मुलगा अत्यंत मेहनती. वडील किसनराव देशमुख यांच्या निधनामुळे आईला साथ देण्याकरता कमी वयातच अक्षयने मोठ्या उमेदीने कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मागील वर्षी त्याचे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊन सोबत घर चालवण्यासाठी शेतीमध्ये सुद्धा त्याने लक्ष द्यायला सुरुवात केली.
आता नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी शेताला बांध घालावे यासाठी दोन दिवसापासून अक्षय जेसीबीच्या शोधात होता. अखेर जेसीबी चालक शेतात यायला तयार झाला. त्यामुळे आज शेतात काम करण्याचे ठरले. त्यामुळे तो सकाळी लवकर उठून शेतात जाण्याची तयारी करत होता. परंतु, आज त्याच्यासोबत काय घडणार होते, याची त्याला पुसटशी कल्पना देखील नव्हती.
मोठ्या उत्साहाने तो शेतात गेला आणि तोच त्याचा अखेर ठरला. जेसीबी आलं आणि कामाला सुरुवात झाली. बांध कुठे घालायचा हे सांगण्यासाठी तो जेसीबी मध्ये चालकाच्या बाजूला बसला. परंतु काही क्षणातच काळाने त्यावर झडप घातली. जेसीबी उलटल्याने अक्षय जेसीबीच्या खाली कोसळला आणि त्याच्या अंगावर जेसीबी कोसळल्याने तो खाली अडकला. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा सुरू केली. परंतु जेसीबी काढणं शक्य नव्हते, जवळपास अर्धा तास तो जेसीबी खाली अडकला. परिसरातील नागरिकांनी दुसरं जेसीबी आणली आणि त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले.
तातडीने मेहकर येथील खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. परंतु अक्षयची प्रकृती अत्यावस्त असल्याने डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्याचा सल्ला दिला. परंतु रस्त्याने जात असतानाच अक्षयची प्रणाज्योत मालवली. या सर्व घटनेदरम्यान अखेरच्या श्वासापर्यंत ” ओ दादा, भाऊ मला वाचवा” बास्स एवढे शब्द त्याच्या तोंडातून येत होते. या सर्व घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.