पालकांनी शाळेत जाऊन चौकशी सुरू केली आहे. यावर बेकायदा शाळाचालकांनी तुमच्या विद्यार्थ्याला आम्ही इतर मान्यताप्राप्त शाळांचा दाखला देऊ, असे सांगितले जात आहे. शिक्षण विभागाकडे याची चौकशी केली असता शाळाप्रवेश एका शाळेत आणि शिक्षण दुसऱ्या शाळेत असे होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बोगस शाळांचे प्रशासन मान्यताप्राप्त शाळांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱ्या शाळेत दाखवतात आणि वर्ग मात्र स्वत:च्या मान्यता नसलेल्या बेकायदा शाळांमध्ये भरवतात, असे प्रकार पनवेलमध्ये सुरू असून २३ शाळांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेत प्रवेशाच्या बहाण्याने चौकशी करून करंजाडेतील एका शाळेचे बोगस प्रकरण समोर आणले होते.
बोगस शाळांमध्ये सध्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू, परंतु पालकांनी नव्याने या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नयेत. पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी शाळेच्या मान्यतेबाबत चौकशी करावी, शंका असल्यास पनवेल पंचायतीशी संपर्क साधावा.- एस. आर. मोहिते, गटशिक्षणधिकारी, पनवेल