काय आहे नेमकं प्रकरण?
केटरिंगच्या कामाचं आमिष दाखवत नाशिकच्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून एका महिलेनं तिला आळंदी या ठिकाणी नेत ८० हजारात तिचा सौदा केला. त्यानंतर हैदराबाद येथील तरुणाशी बळजबरीने विवाह लावून दिला आणि त्यानंतर त्या मुलीला हैदराबाद या ठिकाणी नेऊन डांबून ठेवलं. मात्र, मुलीने हुशारी दाखवत “तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या घरच्यांना सांगा”, असं सांगत त्यांना घेऊन ते पुणे या ठिकाणी आले.
पुण्यात येताच पीडित मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी तिला विचारणा केली. मुलीने आपल्यासोबत काय घडलं ती सर्व माहिती सांगितल्यानंतर पुण्याच्या नागरिकांनी मुलीच्या भावांशी संवाद साधत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी तातडीने मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणले असता रुग्णालयात संबंधित महिला आणि तरुण आले असता त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित महिला आणि एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपींना कठोर शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी
परराज्यात मुलींना नेत त्यांची विक्री करणे आणि लग्न लावून देणे, असं आणखी काही या लोकांनी केलं आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. यातून मुलींची विक्री करणारं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. या मुलीसोबत जो प्रकार घडला तो इतर कोणासोबत घडू नये, यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणी उपनगर पोलिसांनी एका महिला एजंटसह एकाला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत. या माध्यमातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तविली आहे.