१९० वर्षांची परंपरा जपत अंकली संस्थानचे उर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे हे जपण्याचे काम करत आहेत. माऊलींच्या पालखीचे ११ जून रोजी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी आळंदी देवस्थान सज्ज झालं आहे. वारकरी देखील अलंकापुरीत दाखल होत आहेत.
अंकली येथील शितोळे सरकारांच्या अश्वांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या अग्रस्थानाचा मान आहे. दरवर्षी या पालखी सोहळ्याच्या १२ दिवस अगोदर मानाचे अश्व अंकली येथून प्रस्थान करुन अंकली ते आळंदी हा ३१५ किलोमीटरचा मार्ग पायी पार करत ते पुण्यात दाखल होतात. ‘हिरा’ आणि ‘मोती’ अशी माऊलींच्या मानाच्या अश्वांची नावे आहेत. त्यांच्यासोबत जरीपटका आणि गादी देखील असते. अश्वांसोबत त्याचे देखील पूजन करण्याची परंपरा आहे. पूजन केल्यानंतर ही गादी अश्वांवर ठेवली जाते. तसेच मानाचा असणारा जरीपटका स्वाराकडे सांभाळण्यासाठी सुपूर्द केला जातो, असं घोडेस्वार तुकाराम कोळी यांनी सांगितलं आहे.
यंदाचा पालखी सोहळा विना विघ्न पार पडत असून वारकऱ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळत आहे. ११ जून रोजी माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होणार आहे. आज पुण्यातील रास्ता पेठ येथे हे अश्व विसावा घेणार आहेत. वारी दरम्यान माऊलींच्या दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी पुरणपोळीचा महानैवेद्य शितोळे सरकार यांच्याकडून दिला जातो. त्यासाठीच्या शिध्याचे साहित्यही मानाच्या अश्वांसोबत पाठविण्यात येते. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहेऱ्यावर पाहायला मिळत आहे.