• Tue. Nov 26th, 2024

    उपचारासाठी ऑनलाइन नंबर शोधणं पडलं महागात; एक लिंक ओपन केली अन् अडीच लाख गायब

    उपचारासाठी ऑनलाइन नंबर शोधणं पडलं महागात; एक लिंक ओपन केली अन् अडीच लाख गायब

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुलीवर उपचार करण्यासाठी ऑनलाइन नंबर शोधून त्यावर बोलल्यानंतर सायबर चोराने एक लिंक पाठविली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यावर असलेले दोन लाख ४४ हजार रुपये सायबर चोराने काढून घेतले.काय घडलं?

    या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात सरकारी सेवेत असलेले विजय रामदास सोनवणे (वय ४४, रा. सुप्रियानगर, पडेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ एप्रिल रोजी त्यांची मुलगी आजारी होती. तिच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी वरद हॉस्पिटल, उस्मानपुरा यांचा संपर्क क्रमांक ऑनलाइन शोधला. त्या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर ९०२८१२९३८६ यावरून हॉस्पिटल सर्विसच्या नावाने सोनवणे यांना फोन आला. त्यांनी एक लिंक पाठविली. या लिंकवर रुग्णाचे नाव, पत्ता; तसेच १० रुपये चार्जेस भरण्याबाबत सांगितले. त्यानंतर ८२७४०६०७९४ या क्रमांकावरून एक लिंक आली. त्यावर सोनवणे यांनी तपशील भरून १० रुपये ऑनलाइन दिले. त्यानंतर सोनवणे यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी ही प्रक्रिया असल्याचा विचार करून विचारलेला ओपीटीही दिला.

    या प्रक्रियेनंतर १२ एप्रिल रोजी त्यांच्या खात्यातून ९४ हजार ९९९ रुपये; तसेच १४ एप्रिलला ४९ हजार ९९९ रुपयांची कपात झाली. सायबर चोराने लिंक पाठवून १२ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात एकूण दोन लाख ४४ हजार ९९६ रुपये काढून सोनवणे यांची फसवणूक केली. या प्रकरणात सोनवणे यांच्या तक्रारीवरून लिंक पाठविणाऱ्या ८२७४०६०७९४ या क्रमांकाच्या विरोधात छावणी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने करीत आहेत.

    हॉस्पिटलच्या नावाने ७८ हजारांची फसवणूक

    सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीत मोबाइल वापरकर्त्याला चिश्तिया चौकात असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये नोंदणी करण्यासाठी एक रुपये लिंकवर ट्रान्सफर करण्याचे सांगितले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्यांच्या खात्यावरून ७८ हजार रुपये गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. सायबर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
    नेटवर ‘रिव्ह्यु’ चक्रात फसत आहेत तरुण; पैसे कमविण्याच्या नावे कित्येकांना लुटले, नागपुरातील घटना
    लिंक ओपन करून नका…

    – गुगल सर्च इंजिनवर हॉस्पिटलसह फायनान्स संस्थांच्या नावाखाली अनेक मोबाइल नंबर देण्यात आले आहेत. अशा मोबाइल नंबरवर संपर्क करू नका. शक्यतो संबंधित हॉस्पिटल किंवा फायनान्स कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा.
    – संबंधित संपर्क क्रमांकावर कोणतीही लिंक पाठवल्यास त्याच्यावर आपली माहिती भरू नका.
    – संबंधित लिंकवर एक रुपया किंवा १० रुपये ट्रान्सफर करण्याबाबत सांगण्यात येते. मात्र, पैसे ट्रान्सफर करू नका. तसे केल्यास तुमच्या बँक खात्याची माहिती सायबर चोरांकडे पोहोचते.
    – कोणत्याही प्रकारचे ओटीपी शेअर करू नका.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed