राज्यात उष्ण व दमट हवामान वाढले आहे. मे महिन्यात ‘मोका’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झाले होते. अंदमान आणि निकोबार बेटांशिवाय भारतीय मुख्य भूभागावर त्याचा प्रभाव दिसला नाही. मात्र, आग्नेय अरबी समुद्रात नऊ जून २०२३ च्या सुमारास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊ शकते. सध्या अरबी समुद्रावरील परिस्थिती चक्रीवादळासाठी अनुकूल आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश आणि ३१ अंशाच्या श्रेणीत उबदार असते. कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू चक्रवातात आणि नंतर चक्रीवादळात तीव्र होऊ शकते. या चक्रीवादळाचे नाव ‘बिपरजॉय’ असणार आहे.
यावर्षी केरळमध्ये उशिरा दाखल होणाऱ्या मान्सूनमुळे पावसाचे आगमन उशीर होईल, असे हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. नऊ जूननंतर बदललेल्या परिस्थितीत केरळ ते महाराष्ट्र या पश्चिम किनाऱ्यावर पावसाच्या हालचाली तीव्र होतील. चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह कोकण विभागात चार दिवस उशिरा पोहचणारा मान्सून मुंबईत वेळेवर पोहोचण्यास मदत होणार आहे. १० ते ११ जून दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पश्चिम दक्षिण किनाऱ्यावर समुद्राची स्थिती उग्र ते अत्यंत खवळलेल्या स्थितीत असेल, असे औंधकर यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, गोवा, तेलंगण व तमिळनाडू राज्यात पाऊस होणार आहे. कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्रात १३ व १४ जून दरम्यान पाऊस होईल, पण दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात फारसा परिणाम दिसत नसल्याने चांगल्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे असं एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम विद्यापीठ संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं.