सीसीटीव्ही फूटेजमध्ये रिक्षा सापडली असता त्याचा रिक्षा क्रमांक शोधण्यासाठी त्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संतोष समेळ यांची मदत घेतली. त्यानंतर रिक्षाचालक शोधून काढला. सुरवातीला चालकाने कॅमेरा रिक्षात नव्हताच, असे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शेख यांचा कॅमेरा आणून दिला. जाधव यांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल शेख यांनी सर्व वाहतूक पोलिसांचे आभार मानले. ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते व कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या उपस्थितीत हा कॅमेरा शेख यांना सुपूर्द करण्यात आला.
जाधव यांची नेत्रदीपक कामगिरी
अवघ्या काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाचा रिक्षात विसरलेला लॅपटॉप जाधव यांनी अशाच पद्धतीने शोधून दिला होता. आताही शेख यांचा कॅमेरा त्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन मिळवून दिला. आतापर्यंत रिक्षात विसरलेले एकूण ४८ मोबाइल, प्रत्येकी दोन लॅपटॉप व कॅमेरे आणि प्रवाशांचे महागडे कपडे, रोकड, कागदपत्रे जाधव यांनी हुडकून दिली आहेत. खाकी वर्दीच्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार काम करत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी दिली.