राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षाने हा मेळावा आयोजित केला होता. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केडगाव येथील मैदानाची जागा निश्चित करून त्यावर तयारीही सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे येऊन तयारीची पाहणी केली होती. आढावा बैठकही घेतली होती. मात्र, आज हवामान विभागाचा अंदाज आल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ जून २०२३ रोजी, केडगाव, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, मेळावा रद्द करण्यात आला नसून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुढील तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. अर्थात लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे नगरच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.