मिळालेल्या माहितीनुसार, दगडी सबगव्हाण येथील सुनील आबाजी ठाकरे हा भाऊसाहेब गोपीचंद पाटील यांच्याकडे सालदार म्हणून कामास होता. रविवारी सुनील हा भाऊसाहेब पाटील यांच्या सबगव्हाण शिवारातील गट नं. ९५ या शेतात काम करत होता. ११ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा तसेच विजांचा कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे सुनील हा काम सोडून शेतातील निंबाच्या झाडाखाली उभा राहिला. याचदरम्यान त्याच्या अंगावर वीज पडली. सुनील बेशुध्द पडला.
घटनेची माहिती देण्यासाठी प्रमोद गोपीचंद पाटील यांनी घराकडे धाव घेतली आणि त्यांचे भाऊ शरद गोपीचंद पाटील यांना या घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार शरद पाटील, आबा गुलाब भिल, भटू सखाराम पाटील, जितेंद्र भाऊलाल पाटील, उदीलाल बंडू पाटील यांनी लागलीच शेताकडे धाव घेतली आणि बेशुध्दावस्थेत पडलेल्या सुनील याला तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी सुनील यास मयत घोषित केले. या प्रकरणी शरद गोपीचंद पाटील यांच्या खबरीवरुन पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी हे करत आहेत.
सुदैवाने इतर तिघांना कुठलीही इजा नाही
याचवेळी सुनील यांच्यासोबत शेतात लोटन भास्कर पाटील आणि त्यांचे दोन मुले हे सुध्दा काम करत होते. वारा आणि पाऊस सुरु झाल्याने ते सुध्दा सुनील यांच्यासोबत निंबाच्या झाडाखाली उभे राहिले होते. मात्र, लोटन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांना सुदैवाने कुठलीही इजा झालेली नाही. काळ आला पण वेळ आली नव्हती याचा प्रयत्य यावेळी लोटन पाटील यांच्या बाबतीत आल्याची गावात चर्चा आहे.
दरम्यान, वादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दगडी सबगव्हाण गावातसुध्दा वादळी वाऱ्यामुळे गावातील वाल्मिक शंकर भिल आणि जोगी यांच्यासह पाच घरांची पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. तर वादळाचा जोर अधिक असल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली आहेत.