शेखर पानबुडे (वय ४२, रा. धरमपेठ), पंकज चौरागडे (वय ४८, रा. गोंदिया), पुरु मेश्राम (वय ४०), लोकेश अमृत ननावरे (वय ३४, रा. भद्रावती), अनिकेत डोंगरे (वय ३४, रा. बेलतरोडी), अनिल डोंगरे (वय ४५) व अनिमेश टेंभेकर (वय ३८) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उमेश नाना काकडे (वय ३२, रा. भद्रावती) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
उमेशचे एमएपर्यंत शिक्षण झाले असून, तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मे २०१९मध्ये नोकरीबाबत तो लोकेश ननावरेसोबत बोलला. लोकेशने नागपुरातील उज्ज्वलनगर येथील हिंदुस्थान स्काउट अॅण्ड गाइड संस्थेत संपर्क करण्याचा सल्ला उमेशला दिला. त्यानंतर लोकेश हा उमेशला घेऊन नागपुरात आला. त्याने उमेशची अनिकेत व अनिल डोंगरेसोबत ओळख करून दिली. दोघे त्याला कार्यालयात घेऊन गेले. तेथे शेखर पानबुडे, पुरु मेश्राम व पंकज चौरागडेने स्काउड गाइड प्रशिक्षकाची नोकरी मिळवून देण्यासाठी त्याच्याकडून आठ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याला एका शाळेत प्रशिक्षणासाठी पाठविले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही उमेशला नोकरी मिळाली नाही. त्याने आरोपींसोबत संपर्क साधला. ठकबाजांनी भ्रदावतीमधीलच एका शाळेत नियुक्ती झाल्याचे पत्र त्याला दिले. त्याने तेथे सहा महिने काम केले. मात्र, त्याला पगार मिळाला नाही.
शाळेत अशाप्रकारची कोणतीही नियुक्ती झालेली नाही, असे त्याला कळले. मोबाइल बंद करून आरोपी पसार झाले. उमेशने सोनेगाव पोलिसांत तक्रार दिली. ठकबाजांनी अशाप्रकारचे एक डझन तरुणांची कोट्यवधीने फसवणूक केल्याचे समोर आले. पोलिस ठकबाजांचा शोध घेत आहेत.