दऱ्या-खोऱ्यांमध्ये अनेक छोट्या पावसाळी वनस्पती थंडीनंतर वाळून मरतात. मात्र, त्यांच्या बिया पावसाळ्यात जमिनीत रुजतात आणि नवीन रोपे येतात. जलउभारी वनस्पती मात्र या बिया रुजवून नवीन झाडे तयार करण्याऐवजी पाण्याशिवाय जगण्याचा प्रयत्न करून पावसाळ्यात नव्याने फुलतात. ऑस्ट्रेलियातील ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. डोनाल्ड गाफ आणि मुंबईच्या पी व्ही. बोले यांनी १९८६मध्ये भारतातील अशा नऊ जातींच्या वनस्पतींचा शोध लावला होता. त्यानंतर या विषयावर फारसा अभ्यास झाला नाही, असे डॉ. मंदार दातार यांनी सांगितले.
‘दुष्काळी प्रदेशासाठी होऊ शकतो उपयोग’
हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना समोरे जाताना पाण्याशिवाय जगणाऱ्या या जलउभारी वनस्पतींचा अनेक प्रकारे आपल्याला उपयोग करता येऊ शकतो, असे दक्षिण आफ्रिकेतील अभ्यासक डॉ. जील फेटेन्ट सांगतात. विषम काळात टिकून राहण्यासाठी कारणीभूत असलेल्या या वनस्पतींमधील जनुकांचा पिकांसाठी वापर केल्यास भविष्यात कमी पाण्यातही त्यांची चांगली वाढ होऊ शकते; तसेच दुष्काळी प्रदेशातील हरित आच्छादन वाढविण्यासाठीही त्यांचा उपयोग करता येईल, यावर डॉ. फेटेन्ट यांचे संशोधन सुरू आहे. भारतातही अशा प्रकारच्या संशोधनासाठी खूप संधी आहेत, असे डॉ. मंदार दातार यांनी सांगितले.
‘ड्राय बट डोण्ट डाय’
‘ड्राय बट डोण्ट डाय’ हे तत्त्व बाळगून जगणाऱ्या जलउभारी या वनस्पती पश्चिम घाटातील डोंगरावरील कड्यावर आढळतात. पावसाळ्यात त्या इतरांप्रमाणे टवटवीत असतात. पाऊस ओसरल्यानंतर हळूहळू त्यांची पाने वाळायला लागतात. वाळलेली ही झाडे आपल्याला मृत वाटतात, प्रत्यक्षात त्यातली काही पाने सुप्तावस्थेत जाऊन चयापयाची क्रिया मंद करतात. त्यांनी साठवलेले ९५ टक्के पाणी गमावले तरी वनस्पती जिवंत असतात. पाणी मिळाले की त्या स्वत:ला पुनरुज्जीवित करतात. इतर वनस्पती तग धरू शकणार नाहीत, अशा प्रतिकूल वातावरणात, कठोर, कोरड्या वातावरणात जगण्याची या वनस्पतीची क्षमता निसर्गतः उत्क्रांत झाली आहे. उत्तर भारतात; तसेच हिमालयात वाढणारी संजीवनी नावाची वनस्पती याच प्रकारची आहे.