• Sat. Sep 21st, 2024

वाघांच्या झुंजीत ‘सावकार’चा मृत्यू! कुजलेल्या अवस्थेत सापडले शव, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना

वाघांच्या झुंजीत ‘सावकार’चा मृत्यू! कुजलेल्या अवस्थेत सापडले शव, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात शनिवारी वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मरण पावलेला वाघ हा ब्रह्मपुरी येथून या जंगलात आलेला ‘सावकार’ नावाचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आला आहे.

अशी आहे घटना

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळी नियमित गस्तीदरम्यान एका नाल्याच्या किनाऱ्यावरील दाट झुडुपात कुजलेल्या अवस्थेतील ‌वाघाचे शव आढ‌ळून आले. या घटनेची माहिती मिळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी आणि बोर अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांनी घटनास्थळ गाठले. पूर्ण वाढीच्या या वाघाच्या अंगावर सुळे घुसलेल्या खुणा तसेच खुब्याचे तुटलेले हाड आढळले आहे. यावरून दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात पुढील तपास साहाय्यक वनसंरक्षक मंगेश ठेंगडी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे करीत आहेत.

मेळघाटात आढळला जखमी वाघ; जखमी होण्याचे कारण अजूनही अस्पष्ट, महिनाभरातील दुसरी घटना
वाघाच्या शवविच्छेदनादरम्यान क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई, मानद वन्यजीवरक्षक अविनाश लोंढे, व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे प्रतिनिधी प्रफुल्ल भांबुरकर आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी टेंभुर्णे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed