डॉ. के. एच. गोविंदराज यांची बदली नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. गोविंदराज यांच्याकडे याआधी एमएमआरडीच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदाची जबाबदारी होती. तर, डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे आता एमएमआरडीएची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुखर्जी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. आशीष शर्मा यांची बदली एमएमआरडीएचे अतिरक्त महानगर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
मंगळवारी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची मंत्रालयात वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी, तर अतिरिक्त मुख्य साचिव मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर येथील वस्त्रोद्योग विभागाचे संचालक पी. सीवा संकर यांची शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली होती. तर तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली होती.
एकाच अधिकाऱ्याची २४ तासांत पुन्हा बदली
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांची शनिवारी पुन्हा एकदा बदली करण्यात आली. शुक्रवारी जाहीर झालेल्या बदल्यांमध्ये मंत्रालयात नगरविकास विभाग २ मध्ये प्रधान सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र अवघ्या २४ तासांत शर्मा यांना नवी नियुक्ती देण्यात आली. नव्या आदेशानुसार आशीष शर्मा यांना एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त २ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.