पीडित आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी परीसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिहाना परवीन वसीम अन्सारी असे पीडित महिलेचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी तिचा पती वसीम अन्सारी हा मोमीनपुरा परिसरात राहत असून त्याला दारूचे व्यसन होते. परिवाराशी पटत नसल्याने पती-पत्नी चारही मुलांसह बुलढाणा येथील सैलानी येथे गेले होते.
वसीम अन्सारी हा तेथील एका लॉजमध्ये साफसफाईचे काम करायचा. गुरुवारी रिहानाचे पती वसीम याच्याशी काही कारणावरून भांडण झाले. या भांडणातून ती आपल्या चार मुलांसह रेल्वेने नागपूरला पोहोचली. नागपूरला आल्यानंतर ती पायीच मोमीनपुरा येथे पोहोचली. जिथे ती आपल्या चार मुलांसह जामा मशिदीजवळील कापड दुकानासमोर फूटपाथवर झोपली होती.
पहाटे साडेचारच्या सुमारास चिमुकल्याला दुध पाजल्यानंतर ती बाळासह झोपली. पहाटे पाच वाजता तिला जाग आली तेव्हा तिचा अवेश नावाचा ५ महिन्यांचा निरागस मुलगा बेपत्ता होता. आजूबाजूच्या परिसरात चौकशी केल्यानंतर महिलेने तिच्या तीन मुलांसह तहसील पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला आठ मुले होती, त्यापैकी तीन मुले इतर कुटुंबांनी दत्तक घेतली आहेत. तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तहसील पोलिसांचे पथक ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलीस आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.