• Sat. Sep 21st, 2024

उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावंत कचाट्यात! मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंचा राजकीय गेम प्लॅन उघड

उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावंत कचाट्यात! मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंचा राजकीय गेम प्लॅन उघड

सिंधुदुर्ग : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी तालुक्यात करण्याचे नियोजन होते. राज्यात मुख्यमंत्री शिंदेंबरोबर ठाकरे सोडून गेलेले आमदार ज्या-ज्या ठिकाणी होते त्या-त्या ठिकाणी ह्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्यासोबत आलेल्या आमदारांना ताकद देण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील हा नियोजित कार्यक्रम कुडाळमध्ये घेण्यात येत असल्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाही यांना धोबीपछाड देण्यासाठी ही जागा बदलण्यात आल्याचं समजतं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे संबंध असल्याने राज्यातील या अभियानाच्या शुभारंभाचा निकष बहुदा सिंधुदुर्ग जिल्हा पुरता बाजूला ठेवण्यात आला, अशी चर्चा आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातही पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अन्य ठिकाणीच हा निकष लावण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करण्याच्या दृष्टीने राणेंनी आतापासूनच कंबर कसली आहे.
आणि म्हणून या अभियानाच्या शुभारंभ निमित्ताने मुख्यमंत्र्यांना कुडाळमध्ये आणत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

पायाखालची वाळू सरकली, पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागले, राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली हे सावंतवाडी मतदारसंघात आमदारकीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित जिल्हास्तरीय अभियानाच्या शुभारंभाचा कार्यक्रम राणेंनी आपले राजकीय वजन वापरून आमदार वैभव नाईक यांना शह देण्याकरिता कुडाळमध्ये घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यातून दीपक केसरकर यांची या बदललेल्या जागे करिता सहमती आहे का? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.

राणेंचा राजीनामा, वैभव नाईकांचं वक्तव्य; कानफाटात मारली असती म्हणत केंद्रीय मंत्र्यांचा प्रहार

आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहत अखेरपर्यंत ठाकरे सोबत राहण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी काही वेळा टीका केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर कुडाळमधील ठाकरे गटाचा गड भाजपने आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे चित्र या अभियानाच्या निमित्ताने दिसत आहे. त्यामुळे येत्या शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊन काळात वैभव नाईक यांना रोखण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. यात वैभव नाईक यांच्या एसीबी कारवाई पाठोपाठ आता या माध्यमातून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या कोंडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा होत असलेला दौरा हा महत्त्वपूर्ण आहे. निलेश राणेंच्या कुडाळ मतदारसंघातील दावेदारीच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच या घडामोडीनंतर आमदार वैभव नाईक हे काय भूमिका घेणार ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

एकंदरीत शिंदे गटाकडून आमदार वैभव नाईक यांचा मतदारसंघ पोखरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून राणेंच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात घडणाऱ्या घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed