• Mon. Nov 25th, 2024
    भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर नोटा उधळल्या, नेमकं कारण काय? वाचा…

    नाशिक : नाशिकरोड येथील व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज बाद करताना घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी मुख्य निवडणूक अधिकारी गौतम बलसाने यांच्यावर नोटा उधळत निषेध आंदोलन केले. नाशिकरोड व्यापारी बँकेची निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशान्वये पोटनियम दुरुस्तीच्या निकषावरून या निवडणुकीतील ५६ अर्ज अवैध ठरवले. मात्र यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी केला असून, चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा दावा करण्यात आलाय.

    निवडणूक मॅनेज केलीये आरोप करत नोटांची उधळण

    या विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी नाशिकच्या सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच निषेध म्हणून बलसाने यांच्या अंगावर नोटा उधळण्यात आल्या. गौतम बलसाने यांनी पैसे घेत अर्ज बाद केल्याचा आरोप करण्यात आलाय.

    याप्रकरणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक गौतम बलसाने यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत एका उमेवाराच्या अर्जाबद्दल नाशिकरोड व्यापारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कदम यांनी नजरचुकीने चुकीची माहिती दिल्याने अर्ज बाद झाला होता. मात्र कदम यांनी माहिती दुरुस्त करून योग्य माहिती दिल्याने त्या उमेदवाराचा अर्ज वैध ठरविल्याची माहिती बलसाने यांनी दिली. त्यामुळे या निवडणुकीत सद्यस्थितीत ५५ अर्ज अवैध असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी दिली.

    तसेच याप्रकरणी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांना काही अर्थ नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उमेदवाराबद्दल जी चुकीची माहिती दिली, त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची देखील माहिती दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *