या घटनेमुळे मंद्रुप परिसरात या घटनेचीच चर्चा आहे. कारण हत्या करणाऱ्याने आत्महत्या केली आहे, त्यामुळे हत्येचं नेमकं कारण समोर आलं नाही. मंद्रुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीत अनेक महिन्यांपासून वाद होत होते. त्या घरगुती वादातून ही हत्या आणि आत्महत्या झाली आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पती लाडलेसाब हुसेन नदाफ (वय ६५, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) याने पत्नी नगमा लाडलेसाब नदाफ (वय ६३) यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर लाडलेसाब नदाफ याने घरासमोर असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
घरगुती भांडणाचा शेवट असा झाला
लाडलेसाब नदाफ आणि नगमा नदाफ हे दोघे वृद्ध पती-पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून मंद्रुप येथे वास्तव्यास आहेत. तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. तिन्ही मुलींचे लग्न झाले असून मुलगा बाहेरगावी नोकरी करतो. त्यामुळे लाडलेसाब नदाफ आणि नगमा नदाफ हे दोघे एकटेच घरी राहत होते. या दोघा वृद्ध दाम्पत्याची एक मुलगी मंद्रुप परिसरात वास्तव्यास आहे. वृद्ध असल्या कारणाने घरातील काम करताना नेहमी या ना त्या कारणाने या वृद्ध दाम्पत्यात वाद होत होते. वाद विकोपाला जाऊन लाडलेसाब नदाफ वृद्ध पत्नी नगमा यांना मारहाण देखील करत होता. अखेर या घरगुती भांडणाचा शेवट झाला असून दोघेही वृद्ध दांपत्य आज हयात नाहीत.
आठ दिवसांपूर्वी मुलीने वृद्ध आई वडिलांची समजूत काढली होती
मंद्रुप पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी या वृद्ध पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून वृद्ध नगमा नदाफ या जवळ राहत असलेल्या मुलीकडे राहायला गेल्या होत्या. आठ दिवसांपूर्वी मुलीने आई वडिलांच्या भांडणात मध्यस्थी करून वाद मिटवला होता. आई-वडिलांची समजूत काढून घरी पाठवले होते. चार ते पाच दिवस झाल्यानंतर पुन्हा वाद सुरू झाले. अखेर बुधवारी पहाटेच्या सुमारास लाडलेसाब नदाफ याने वृद्ध पत्नी नगमा यांच्या गळ्यावर सत्तूरने वार केले. सत्तूरने घाव इतके वर्मी होते की, नगमा यांनी जागेवरच प्राण सोडला. त्यानंतर लाडलेसाब नदाफ याने स्वतःच्या घरासमोर असलेल्या झाडाला गळफास घेत स्वतः देखील आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवले
घटनेची माहिती मिळताच, मंद्रूप पोलीस ठाण्याचे एपीआय रवींद्र मांजरे, पीएसआय शहाजी कांबळे, माजिद शेख, शाहनूर फकीर, सागर चव्हाण, कृष्णा पवार संजय कांबळे, अविनाश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मंद्रुप शिवारात असलेल्या मुलीला घटनास्थळी बोलावून चौकशी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. तिन्ही मुलींना आणि मुलाला पोलीस ठाण्याला बोलावले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.