मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा भाग असलेल्या भूमिगत बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. ‘नेपियन सी रस्ता परिसरात प्रियदर्शनी पार्क येथे हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘ब्रेक-थ्रू’ होताच याठिकाणी उपस्थित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी जल्लोष केला.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत पुढील टप्प्यात दहिसर-मिरा-भाईंदरची जोडणी तयार होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकूण ३२ किलोमीटरचा सागरी किनारी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ‘मुंबई पारबंदर प्रकल्पालाही या किनारी मार्गाची जोड दिल्याने वांद्र्यातून थेट रायगडला जाण्याचा पर्याय मिळणार आहे. परिणामी मुंबईतील वाहतूककोंडी दूर होऊन जलद गतीने प्रवास करता येणार आहे’, असे शिंदे यावेळी म्हणाले. ‘किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत ‘मावळा’ या बोगदा खनन संयंत्र अर्थात टनेल बोरिंग मशिनने (टीबीएम) मावळ्यासारखी कामगिरी करत डोंगर भेदून गड सर केला’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ब्रेक-थ्रू’च्या कार्याचे कौतुक केले.
१५ मिनिटात एक मीटर
किनारी रस्ता निर्मितीसाठी ‘मावळा’ हे बोगदा खनन संयंत्र वापरले आहे. सुमारे १२ मीटर व्यासाच्या ‘मावळा’ने अवघ्या १५ मिनिटांत ‘ब्रेक-थ्रू’ करत खनन पूर्ण केले. बोगद्यातून ‘मावळा’ बाहेर येताच उपस्थितांसह अभियंता, अधिकारी आणि सर्व बांधकाम कामगारांनी जल्लोष केला. हाती तिरंगा घेत त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा जयघोष केला.