यशवंत अशोक मुंढे (वय २२, सध्या रा. वाघोली, मूळ, रा. लातूर) असे मृताचे नाव आहे, तर अनुजा महेश पनाळे (वय २१, सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर ) असे खून करणाऱ्या प्रेयसीचे नाव आहे. दोघेही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा आणि यशवंत यांच्यात प्रेमसंबंध होते. तसेच यशवंत हा तिच्यावर संशय घेत तिला मानसिक त्रास देत होता. तिच्यावर अनेक बंधने देखील आणत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. या संदर्भात त्यांच्या घरच्यांना देखील माहिती असल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी रात्री अनुजा ही यशवंत रहात असलेल्या वसतिगृहात अभ्यासासाठी गेली होती. त्यांचे सोमवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा जोरात भांडण झाले. त्या भांडणात अनुजा हिने यशवंत याच्या छातीवर आणि पोटावर वार केले. त्यामुळे यशवंत याचा जागेवरच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर ती घाबरली. तिने स्वताच्या हाताची नस कापून घेतली. आणि वसतिगृहाच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर येऊन बसली.
तिची अवस्था जवळ असलेल्या विद्यार्थ्यांनी पाहिली आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. तिचे रक्त गेल्याने तिला चक्कर येऊ लागली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वसतिगृहात खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. आपल्याला तो मानसिक त्रास देत होता. त्यातून हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी या घटनेचा तपास केला आहे.
गेल्या एक वर्षांपासून यशवंत आणि अनुजा हे एकमेकांना ओळख होते. मात्र यशवंत हा तिला सारखा त्रास देत होता. तिच्यावर संशय घेत होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.