गौतमी पाटील यांच्या पाटील या आडनावाला आपला विरोध नाही. आडनाव काय लावायचे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेने हा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. म्हणून गौतमींच्या नावाला माझा विरोध नाही तर त्यांच्या अदांना माझा विरोध आहे, असं घनश्याम दरोडे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना दरोडे याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गौतमी पाटील यांची कुठेही गळचेपी होता कामा नये, कोणी जर गौतमी पाटील यांचं आडनाव काढण्याचा प्रयत्न करत असेल तर मी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे, असेही दरोडे पुढे म्हणाला.
९ जूनला घेणार गौतमी पाटील हिची भेट
गौतमी पाटील यांच्या आडनावाला माझा विरोध नसून त्यांच्या अदांना माझा विरोध आहे, असे दरोडे म्हणाला. ९ तारखेला मी गौतमी पाटील यांची भेट घेऊन त्यांना समजावून सांगणार आहे. गौतमींमध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल, महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल, महाराष्ट्राची संस्कृती एक राहिली पाहिजे असं वाटत असेल, तर पाटील या आडनावाला विरोध करून काही होणार नाही. त्यासाठी गौतमींच्या अदांना विरोध केला पाहिजे असे दरोडे म्हणाला.
गौतमी पाटीलला ओपन चॅलेंज
यावेळी बोलताना छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने गौतमी पाटीलला ओपन चॅलेंज केलं आहे. दरोडे म्हणाला की, मी गौतमी पाटील यांना ओपन चॅलेंज करतो की त्यांनी माझा मुसंडी हा चित्रपट पाहा, त्यानंतर कळेल की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. आता ताईला समजावून सांगणे गरजेचे आहे. ताईने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर मी ओपन चॅलेंज देतो की त्यांनी बिहारमध्ये जावं.
महाराष्ट्र तुम्हाला थारा देणार नाही
गौतमी पाटील यांची महाराष्ट्रात जास्त दिवस हवा राहणार नाही, कारण तुम्ही पोरांना वेगळ्या वळणाला लावत आहात, वाईट वळण लावत आहात. हे महाराष्ट्रात कदापि शक्य होणार नाही. गौतमी पाटील यांच्या अदांनी महाराष्ट्राचा बिहार होतोय. म्हणूनत गौतमी पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगावं लागेल, असे दरोडे म्हणाला.