• Mon. Nov 25th, 2024

    अजित पवारांनी सांगितलेला बाळू धानोरकरांच्या दिलदारपणाचा किस्सा ऐकून थक्क व्हाल

    अजित पवारांनी सांगितलेला बाळू धानोरकरांच्या दिलदारपणाचा किस्सा ऐकून थक्क व्हाल

    मुंबई: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळू धानोरकर यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला. बाळू धानोरकर यांचे निधन दु:खद आहे. ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. बाळू धानोरकर हे तरुण होते. धानोरकर साहेब गेलेत यावर अजून विश्वास बसत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

    यावेळी अजित पवार यांनी बाळू धानोरकर यांच्या दिलदारपणाचा एक किस्सा सांगितला. चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षकार्यालय नाही, ही गोष्ट बाळू धानोरकर यांच्या कानावर गेली. तेव्हा धानोरकर यांनी मला म्हटले की, ‘ माझं स्वत:चं कार्यालय आहे, ते मी राष्ट्रवादीच्या कार्यालयासाठी देतो.’ त्यावर मी म्हटलं की, तुम्ही स्वत:चं कार्यालय कसं देता? त्यावर धानोरकर यांनी उत्तर दिले की, मी पवार साहेबांना मानतो, राष्ट्रवादी पक्षही मला आपलाच वाटतो. आपल्या सगळ्यांना मिळूनच काम करायचे आहे. मित्रपक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी स्वत:ची जागा देणार दिलदारपणा बाळू धानोरकर यांच्याकडे होता. ही गोष्ट मी त्यावेळी पवार साहेबांनाही सांगितली होती. बाळू धानोरकर यांचे शरद पवार यांच्याशीही चांगले संबंध होते, असे अजित पवार यांनी सांगितले.

    Balu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…

    गेल्या निवडणुकीत जागावाटप सुरु होते तेव्हा मी बाळू धानोरकर यांना भेटलो होतो. ते खासदार झाल्यावर माझी आणि त्यांची ओळख झाली. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी ते मला भेटले होते. त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. त्यासाठी ते मला भेटायला आले होते. मी त्यांना विचारलं होतं की, ‘तुम्ही काय तयारी केलेय?’ त्यावर धानोरकर यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रपूरची जागा आपल्याला लढवायची आहे, तयारीला लागा, असे सांगितलो होते. पण युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आली. त्यामुळे संपूर्ण तयारी करूनही मला निवडणूक लढवता येणार नाही. मला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं तिकीट द्या, मी लढायला तयार आहे’, असे धानोरकर यांनी म्हटले. त्यावेळी धानोरकर हे पवार साहेबांशीही बोलले. नंतर पवार साहेबांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार म्हणून बाळू धानोरकर यांना संधी देण्यात आली, असे अजित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपची लाट असताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एकमेव जागा निवडून आली. ती जागा बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नामुळेच निवडून आली.

    Balu Dhanorkar: ‘मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; बाळू धानोरकरांनी दिलं होतं थेट PM मोदींना ओपन चॅलेंज

    लोकांशी नाळ जोडलेला, मनमिळाऊ स्वभावाचा नेता: अजित पवार

    मी उपमुख्यमंत्री असताना बाळू धानोरकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर हे दोघेही माझ्याकडे कामं घेऊन यायचे. चंद्रपूर परिसराचा कायापालट झाला पाहिजे, ही बाळू धानोरकर यांची भूमिका होती. ते एखाद्या कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावाही करायचे. बाळू धानोरकर हा सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता होता. मी विरोधी पक्षनेता असताना अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी बाळू धानोरकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत माझ्यासोबत फिरत होते. त्यावेळी मी बाळू धानोरकर यांची लोकप्रियता पाहिली होती. ते लोकप्रिय आणि मनमिळाऊ नेते होते. ते आंदोलनातही आघाडीवर असायचे, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed