कसेल त्याची जमीन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर ‘कसबा’ प्रमाणे पुणे ‘लोकसभा’ पोटनिवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल. असं संजय राऊत म्हणाले आहेत.
तत्पूर्वी अजित पवार यांनी पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. पुण्यात काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, असं अजित पवार म्हणालेत. तर, काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही. आम्ही बोलून काहीही उपयोग नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून याबाबत निर्णय घेतील. आज काँग्रेसने कितीही काहीही म्हटलं तरी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. असं देखील अजित पवार म्हणालेत.
अजित पवारांच्या या दाव्यानंतर काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली असून काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी ही जागा सोडण्यास साफ नकार दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांनी तर अजित पवारांनी महाविकास आघाडीत फारकत पडेल असं काही करू नये असा थेट इशाराच दिलाय. ‘अजितदादा पुण्याच्या जागेवर दावा करत असेल तर त्यांनी सांगावं कसब्याची जागा आम्ही किती दिवसात जिंकली? त्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अजितदादांनी फारकत पडेल असं काही करू नये, ही त्यांना विनंती आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची दिसलेली एकी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र कमजोर होताना दिसत आहे. त्यामुळे मविआच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या संजय राऊत यांनी स्वतः पुढाकार घेऊन मविआच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्याने हे पेल्यातील वादळ शमेल का ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.