म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘मोगलांनी देशाला दिलेले स्थापत्यशास्त्र आणि कला यांचाच नेहमी उल्लेख केला जातो. अकबराला अझिमोशान शहेनशहा संबोधले जाते. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला काही गोष्टींचा पश्चाताप झालाही असेल. मात्र, त्याने पूर्वायुष्यात केलेल्या चुकांचे काय? याच अकबराने ३० हजार हिंदूंची कत्तल केली होती. या मोगलांनी केलेल्या कत्तली आणि हिंदू तसेच जैन मंदिरांची नासधूस नेहमीच लपविण्यात आली’, अशी माहिती माजी खासदार, ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. नितीश भारद्वाज यांनी दिली.संवेदना परिवार संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित ‘शिवरायांच्या राज्याभिषेकाची ३५० वर्षे : अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. भारद्वाज बोलत होते. अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) अधीक्षक राधा मुंजे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेंद्र तायवाडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. भारद्वाज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्यांचा राज्याभिषेक यांमागील कारणे, त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ‘स्वधर्म आणि स्वकियांसाठी संघर्ष करणे हाच खरा धर्म असल्याचा संदेश श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिला आहे. ‘परित्राणाय साधुनां…’ हे कोरडे किंवा पोकळ शब्द नाहीत. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती भगवान श्रीकृष्णाच्या याच संदेशातूनच. स्वराज्य स्थापित होण्यापूर्वी हिंदूंचे दमन होत होते. मुस्लिम आणि विशेषत: मोगल शासकांनी अनन्वित अत्याचार येथील जनतेवर केले. अशा काळात शिवरायांच्या आतील श्रीकृष्ण जागृत झाला आणि हे कार्य घडले. जेव्हा जेव्हा अन्याय वाढले तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कधी शिवराय तर कधी टिळक तर कधी सावरकर आणि कधी भगतसिंहांच्या मुखातून बोलले’, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सावरकर होण्याची तुमची औकात नाही; देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका
हजला देता, मग कैलाश यात्रेलाही द्या!‘भारतातील मुसलमान बांधवांविषयी माझ्या मनात बंधुत्वाची भावना आहे. मात्र, हज यात्रेसाठी सवलत देताना चारधाम यात्रा किंवा कैलास मानसरोवर यात्रेसाठी अशी कोणतीही सवलत का दिली जात नाही? धर्मावर आधारित विशेष सुविधा का द्यायच्या? विशेष वागणूक देण्याची गरज काय?’, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.