म. टा. प्रतिनिधी, नाशिक : तीर्थक्षेत्र आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्थान म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमधील प्राचीन मंदिरांसह नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरांमध्येही लवकरच वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात येणार आहे. या प्रस्तावास मंदिर व्यवस्थापनांचा अनुकूल प्रतिसाद मिळविण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आवाहन केले जाणार असल्याची माहिती महासंघाचे पदाधिकारी आणि श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली.फेब्रुवारी महिन्यात जळगाव येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेची बैठक पार पडली होती. या बैठकीत विविध ठराव करण्यात आले होते. त्यापैकी मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचाही एक विषय पुढे आला होता. राज्यात नागपूरमध्ये चार मंदिरांच्या व्यवस्थापनांनी मंदिर प्रांगणात फलक लावत भाविकांना ‘वस्त्रसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या धर्तीवर तीर्थक्षेत्र आणि मंदिरांचे शहर असलेल्या नाशिकमधील मंदिर व्यवस्थापनांच्या सहभागाबाबत मंदिर महासंघाचे पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाशिकमध्ये या प्रस्तावासाठी भाविकांना आवाहन केले जाणार असल्याचे सांगितले. याबाबतची सुरुवात प्राचीन अशा श्री काळाराम मंदिरापासून केली जाणार आहे. नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरासह श्री कपालेश्वर मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर, श्री सप्तशृंगगड आणि शेजारील जिल्ह्यात शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर या मंदिरांसह इतरही विख्यात मंदिरे आहेत.
…अशी आहे महासंघाची अपेक्षा
नाशिक शहराससरकारकडून धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्राद्धादी कर्मांसह येथे धार्मिक विधींसाठी भारतभरातील विविध राज्यांतून भाविकांची मोठी संख्या वर्षभर उपस्थित असते. पर्यटनाच्या सोबतीलाच मंदिरांचेही पावित्र्य राखले जावे, मंदिर आचारसंहितेचे पालन केले जावे आणि धार्मिक श्रद्धांचा आदर केला जावा, अशा शुद्ध हेतूने भाविकांना वस्त्रसंहितेबाबत आवाहन केले जाणार असल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. मंदिरात प्रवेश करताना अंगप्रदर्शन टाळून योग्य कपडे घातलेले असावेत, वेशभूषा सात्त्विक असावी, घरगुती कपड्यांऐवजी समाजात वावरताना वापरले जातात तसे नियमित कपडे असावेत, अशी मंदिर महासंघाची अपेक्षा आहे.
महत्वाची बातमी! उत्तेजक, तोकड्या कपड्यांना मनाई; नागपूरमधील चार मंदिरांतील ड्रेसकोड चर्चेत
मंदिर हे मन आणि शरीरास स्फूर्ती देणारे उपासना केंद्र आहे. या ठिकाणी सात्त्विक पद्धतीची वेशभूषा भाविकांनीही परिधान करणे अपेक्षित आहे. मंदिर महासंघाने घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील मंदिर देवस्थानांनाही मंदिर प्रवेशावेळी वस्त्रसंहितेबाबत आवाहन करण्यात येणार आहे.-सुधीरदास पुजारी, पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ