• Mon. Nov 25th, 2024

    शिंदे-फडणवीसांवर रुपाली चाकणकर संतापल्या! दिल्लीतील तो फोटो ट्वीट करून सरकारला धरलं धारेवर

    शिंदे-फडणवीसांवर रुपाली चाकणकर संतापल्या! दिल्लीतील तो फोटो ट्वीट करून सरकारला धरलं धारेवर

    मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. कारण या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत सरकारविरोधात हल्लाबोल केल्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्याचं दुष्कृत्य करणाऱ्या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी सरकारकडे केली आहे.रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सदनातील घटनेवर संताप व्यक्त करताना केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे,’ असा गंभीर आरोप यावेळी चाकणकर यांनी केला आहे.

    जुनं संसद भवन हेच माझ्यासाठी लोकशाहीचं मंदिर राहणार, सुप्रिया सुळेंचं विधान

    संभाजीराजेंसोबत बंद दाराआड चर्चा, लोकसभा उमेदवारीबाबत गिरीश महाजन स्पष्टच बोलले…

    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांनीही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दिल्लीतील प्रकाराची चौकशी करून राज्य सरकारकडून काही कारवाई केली जाते, हे पाहावं लागेल.

    रोहित पवारांनी काय म्हटलं आहे?

    सावकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला आहे. ‘महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय महाराष्ट्र सदनातील घटनेवर गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत ते दाखवतील का?’ असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed