• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात, बसची अनेक वाहनांना धडक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

    मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात, बसची अनेक वाहनांना धडक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

    रत्नागिरी : रत्नागिरीजवळ हातखंबा येथे तीव्र उतारावर खासगी लक्झरी बसचा ब्रेक फेल झाला. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात घडला आहे. आज सकाळी हा अपघात झाला. हातखंबा येथे दर्ग्याजवळील उतारावर खासगी बसचा ब्रेक फेल झाला. यानंतर लक्झरी बसने समोरून येणाऱ्या चार वाहनांसह दोन बाइकना धडक दिली. या अपघातामधील जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.ब्रेक फेल झालेली बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या बँकेच्या जुन्या इमारतीवर धडकली आणि तिथे जाऊन थांबली. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साह्याने ही लक्झरी बस बाजूला घेण्यात आली आहे. या अपघातात बसचालक जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. या उतारावर याआधीही मोठे अपघात झाले आहेत.

    हातखंब्याच्या दिशेने येणारी एक ट्रॅव्हल्स शेतिफार्मच्या उतारात आली. यावेळी बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक काशिब खान (वय ४७, राहणार उत्तर प्रदेश ) याच्या लक्षात आले. त्याने बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही बसचा वेग कमी न झाल्यामुळे सुरुवातीला इनोव्हा ( MH 46 AP 4243) कारला जोरदार धडक दिली. यामुळे इनोव्हा थेट रस्त्यालगत असलेल्या रेलिंगवर जाऊन अडकली. त्याच ठिकाणी दुचाकीला ( MH 08 AM 9010) धडक दिली. यामध्ये दुचाकीचा चेंदामेंदा झाला. पुढे दर्ग्याजवळ येऊन स्विफ्ट (MH 24 AS 7482) कारला जबरदस्त धडक दिली. यात स्विफ्ट कारचा मागचा टायर निखळला.

    मुंबई गोवा महामार्गावर अपघात

    ब्रेक निकामी ट्रॅव्हल्सने हातखंबा गावात येऊन आणखी दोन दुचाकींना धडक दिली. त्या रस्त्याच्या बाजूला पडल्या. याच ठिकाणी जुन्या बँकेच्या इमारतीला जाऊन ट्रॅव्हल्स धडकली. या धडकेत ट्रॅव्हल्सचा चालक आतच अडकला होता. त्याला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. ट्रॅव्हल्सने इमारतीला धडकली त्याच ठिकाणी पुन्हा दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीचा चक्काचूर झाला.

    या विचित्र अपघातात एका ट्रॅव्हल्सने तब्बल एकूण सात वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीस्वार शग्गिर अजमिर अंसारी ( वय ३३, राहणार-कोकण नगर), स्विफ्ट कारमधील महेश घोणपडे (राहणार, इचलकरंजी) आणि जितेंद्रकुमार चौगुले (राहणार, इचलकरंजी) हे जखमी झाले.

    Good News : मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी गुड न्यूज, परशुराम घाटातील रस्त्याच्या कामाबाबत मोठी अपडेट
    सुदैवाने या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र धडक दिलेल्या सात ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती. अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांच्यासह हातखंबा टॅबचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम जाधव, महाडिक, हेडकॉन्स्टेबल संसारे, भरणकर, लेंडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंबा सीजनमध्ये कोकणात दरवर्षी येत असलेल्या नेपाळी बांधवांना गावी घेऊन जाण्यासाठी ही ट्रॅव्हल्स आल्याचे बोलले जात आहे.
    पुण्याहून लग्नासाठी कोकणात निघालेले,कार आणि बसची धडक; तो प्रवास अखेरचा ठरला, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
    अपघातातील जखमींना नाणिज धाम येथील नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेतून तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *