ठाण्याहून पनवेल आणि पुढे पुणे, कोल्हापूर आणि अगदी बेंगळुरूपर्यंत जाण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्त्याचा उपयोग केला जातो. याखेरीज तळोजा औद्योगिक वसाहतीमार्गे ठाण्यात येणारे किंवा ठाण्यातून गोव्याकडे जाणारे मुंब्रा-कौसा या मार्गाचा उपयोग करतात. या सर्व वाहनांना कळवा नाक्याचा वापर करावा लागतो. तर याच भागातील अगासन, कोळेगाव, खारेगाव, खर्डीपाडा दिव्यासह नवी मुंबईतील स्थानिकांनाही याच मार्गांचा वापर करावा लागतो. त्यामुळे कळवा नाका परिसरात कायम वाहतुकीची कोंडी होते. हो कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेने आरखड्यात दिव्याजवळील गावांशी जोडणाऱ्या विशेष रस्त्याचे नियोजन केले आहे. हा रस्ता बांधण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयारी सुरू केली आहे.
यासंबंधी ‘एमएमआरडीए’ने व्यवहार्यता अभ्यासासह बृहत् प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढली आहे. या अंतर्गत कळवा नाका ते दिव्याजवळील खारेगाव येथील आत्माराम पाटील चौकापर्यंत ३.९५ किमीचा रस्ता बांधला जाणार आहे. या रस्त्यामुळे कळवा नाका परिसर ठाणे-बेलापूर किंवा मुंब्रा-कौसा मार्गाचा वापर न करता खारेगाव व पुढे दिव्याशी जोडला जाणार आहे. या ३.९५ किमीपैकी १.८५ किमी मार्ग किनारपट्टी क्षेत्र नियमनांतर्गत (सीआरझेड) येतो. त्यामुळेच हा रस्ता बांधण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला सीआरझेडसंबंधी मंजुरीही घ्यावी लागणार आहे. याखेरीज या रस्त्यासाठी मुंब्रा येथील डोंगराचाही अडसर असेल. तेथे बोगदा बांधण्यासंबंधीचा अभ्यास कंत्राटदाराला करावा लागणार आहे. अशा विविध प्रकारच्या अभ्यासांसाठी सहा महिन्यांचा कालावधी असून, २० जूनपर्यंत निविदा भरायची आहे.