• Sat. Sep 21st, 2024

लग्नाचं वचन देऊन नेपाळमधील मुलीला आणलं पुण्यात; खोलीत डांबून ठेवले अन् रोज…, भयंकर घटना

लग्नाचं वचन देऊन नेपाळमधील मुलीला आणलं पुण्यात; खोलीत डांबून ठेवले अन् रोज…, भयंकर घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विवाहाच्या आमिषाने नेपाळमधील अल्पवयीन मुलीला पळवून आणल्यानंतर पुण्यात तिला डांबून ठेवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचा भाऊ तिच्या शोधासाठी नेपाळहून पुण्यात आल्य़ानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अल्पवयीन मुलीची तरुणाच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी तरुणाच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अशी आहे घटना

या प्रकरणात महंमद रफीक शेख (वय २३, सध्या रा. येरवडा, मूळ रा. नेपाळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शेख मूळचा नेपाळचा आहे. त्याने नेपाळमधील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला विवाहाच्या आमिषाने पुण्यात आणले. त्याने तिला येरवडा भागात एका खोलीत डांबून ठेवले. शेख तिला घराबाहेर जाऊ देत नव्हता; तसेच शेजाऱ्यांशी बोलू देत नव्हता. त्याने मुलीवर अत्याचारही केले. आरोपी शेख बिगारी काम करतो. तो कामाला जाताना तिला खोलीत कोंडून ठेवत होता. त्याच्या या त्रासामुळे मुलगी घाबरली होती. तिने आरोपी शेखच्या नकळत त्याच्या मोबाइलवरून नेपाळमध्ये असणाऱ्या भावाला संपर्क साधला. बहिणीने सांगितलेला प्रकार ऐकून भाऊ तातडीने पुण्यात आला. त्याने हडपसर परिसरातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला.

सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांनी युवतीचा शोध घेण्यासाठी तपास पथकाला सूचना केली. त्यानुसार सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळगावे, अश्विनी पाटील यांनी युवतीचा शोध घेण्यास सुरूवात केले. तांत्रिक तपासात मुलगी येरवड्यातील गोल्फ क्लब भागात असल्याची माहिती मिळाली. दाट वस्तीच्या परिसरात युवतीचा शोध घेण्यात अडचण निर्माण झाली होती.

भिवापूर हत्याकांडाचा उलगडा! मुलीनेच दिली वडिलाच्या हत्येची सुपारी; ५ लाखांत ठरला व्यवहार
मुलीच्या भावाने सांगितलेले वर्णन आणि पोलिसांचे कसब, याद्वारे तपास पथक मुलीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तिची खोलीतून सुटका केली. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलिसांनी मुलीला तिच्या भावाच्या ताब्यात दिले. पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed