सदाशिव यांचं नातवांवर विशेष प्रेम. स्वत: निर्व्यसनी असल्याने सदाशिव नातवंडांनाही निर्व्यसनी राहण्याचा सतत उपदेश करत. आयुष्यभरात त्यांना कधीही रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही. मात्र सरस्वती यांना वर्षभरापूर्वी अर्धांगवायू झाला आणि त्या अंथरुणाला खिळल्या. तेव्हापासून सदाशिवराव थोडे खचले होते. अशा परिस्थितीही दोघांनी संसाराचा गाडा आपल्या हाती घेत हिंमतीने कुटुंबाला एकत्र ठेवले. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते कित्येक मैलाचा प्रवास पायीच करत. केवळ कुटुंबातील व्यक्तींवरच नव्हे तर प्राण्यांवरही ते जीवापाड प्रेम करत. २५ एकर शेतीसह त्यांच्याकडे जनावरेही होती. शेतातील माल लातूरच्या बाजारपेठेत नेण्यासाठी ते बैलगाडी घेऊन जात. विशेष म्हणजे त्यांच्या बैलगाडीच्या मागे आठ ते नऊ बैलगाड्या चालकाविना चालत. जनावरांना माया लावली की तेही माणसाला माया लावता,त ही त्यांची धारणा त्या बैलानी सार्थ केली असल्याची आठवण त्यांचे नातू ऋषिकेश जाधव यांनी सांगितली.
दरम्यान, सदाशिव अन् सरस्वती जाधव यांना आंबे खूप आवडत असत. त्यामुळे या दाम्पत्याच्या निधनानंतर जाधव कुटुंबियांनी त्यांच्या आठवणीत शेतात ११ आंब्याची रोपे लावली आहेत. या रोपांना त्यांनी सदाशिव अन् सरस्वती यांच्या अंत्यसंस्कारानंतर राख टाकली आहे. या आंब्यांच्या झाडाच्या रुपात त्यांची माया, प्रेम पुढच्या पिढीलाही मिळत राहील असा विश्वास त्यांचे सर्वात लहान पुत्र शहाजीराव जाधव यांना वाटतो.