म. टा. प्रतिनिधी, पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आता १५ जुलैचा नवा मुहूर्त ठरला आहे. सर्व कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा, अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या चौकातील एका सेवा रस्त्यावरून गुरुवारी वाहतूक सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका सामान्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाची सूत्रे हलली. त्यापूर्वी २०१७मध्ये गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले होते. या उड्डाणपुलाचे उद्घाटन एक मे रोजी करण्याचे यापूर्वी गडकरी यांनी जाहीर केले होते; पण या मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्यात ‘एनएचएआय’ला अपयश आले. त्यामुळे गडकरी गुरुवारी पुण्यात आले असताना, त्यांनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकल्पाचा पुन्हा आढावा घेतला. ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम आणि इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
या प्रकल्पाचा भाग असलेल्या ला कासा सोसायटीजवळील सेवा रस्त्यावरून वाहतूक गुरुवारी सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना साताऱ्याला जाता येणे शक्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.‘गर्डरसाठी थांबणार नाही’
या बैठकीबाबत कदम म्हणाले, ‘चांदणी चौकातील मार्गाचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत सात टक्क्यांमध्ये उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. येत्या एक जून रोजी मध्यभागातील गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याने मध्यभागी टाकण्यात येणाऱ्या गर्डरसाठी वाहतूक थांबवण्याची गरज नाही. ही वाहतूक सेवा रस्त्यांवरून सुरू राहील. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. रंगरंगोटीची कामेही शिल्लक आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे येत्या १५ जुलैला उद्घाटन करण्याचे आदेश वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.’