महापालिका शाळेचे नुकसान
आगीमध्ये लाकडाच्या गोदामातील साहित्य, शेजारी असलेल्या महापालिकेच्या शाळेमधील खिडकीची लाकडी दारे, विद्यार्थ्यांचे बसायचे बाक, तसेच मुख्याध्यापकांच्या खोलीतील साहित्यही जळाले. त्यामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच, शाळेच्या अंतिम परीक्षेच्या उत्तरपत्रिकाही काही प्रमाणात जळून खाक झाल्याचे समजते.
तीस वर्षांत प्रथमच दुर्घटना
टिंबर मार्केटमध्ये प्रकाश मुथा यांच्या वर्धमान एंटरप्रायजेच नावाच्या गोदामाला आग लागली. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे या ठिकाणी गोदाम आहे. मात्र, या काळात कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. मात्र, गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीमुळे होत्याचे नव्हते झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांचा तक्रारींचा पाढा
टिंबर मार्केटमधील गोदामांना लागलेल्या आगीनंतर येथील व्यापाऱ्यांनी मदतकार्यातील त्रुटींपासून विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी गुरुवारी सकाळी दुर्घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. तसेच, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
येत्या सोमवारी बैठक; नुकसान भरपाई मिळणार ?
आग कशामुळे लागली, काय चुका झाल्या आहेत, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी काय केले पाहिजे, यासाठी टिंबर मार्केटमधील व्यापारी आणि महापालिका प्रशासनाची आयुक्तांकडे येत्या सोमवारी बैठक होणार आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी संबंधिताना नुकसान भरपाई देण्याबाबत पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
टिंबर मार्केट हा अतिसंवेदनशील परिसर आहे. त्यामुळे अग्निशमन दलासाठी या परिसरात पाण्याची स्वतंत्र वाहिनी टाकलेली आहे. मात्र, ती बंद असल्याने अग्निशमन दलाला पाण्याची कमतरता भासली. ते जवळच्या कालव्यातून पाणी आणत होते. त्यात बरासचा वेळ गेला. त्यामुळे आग पसरली. या ठिकाणच्या नाल्यालगत दुकाने आहेत. तेथे नाल्यात कचरा टाकला जातो. या कचऱ्यामुळे नाला तुंबू नये, यासाठी कचऱ्याला आग लावली जाते. या प्रकारामुळेही आग लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.- विजय ओसवाल, व्यापारी