अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येत आहे. यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी गोखले पुलाचे काम संपूर्ण काम मार्च २०२४मध्ये पूर्ण होणार आहे. गोखले पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मोगरा पम्पिंग स्टेशनचे काम करणे शक्य होणार नाही, असे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अंधेरी सबवे जवळ येथे पाणी साठवण टाकी बांधणे तसेच पश्चिम रेल्वेच्याखाली मायक्रोटनेलिंग पद्धतीने जलवाहिनी टाकणे आणि १६०० क्युबिक मीटर टनेलिंगचे काम प्रस्तावित केले आहे. अंधेरी सबवे ते भरडवाडी रोडपर्यंत येणारे पावसाचे पाणी साठवण टाकीत जमा केले जाईल आणि उच्च क्षमतेच्या सबमर्सिबल पंपांच्या मदतीने जलवाहिनीद्वारे ते मोगरा नाल्यातून सोडले जाणार आहे. या कामासाठी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च केले जाणार. गोखले पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता हे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.
पाण्याच्या निचऱ्यासाठी सहा पंप
मोगरा पम्पिंग स्टेशनचे काम तूर्तास पूर्ण होणे शक्य नसल्याने अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी, वर्सोवा या भागांतील रहिवाशांना पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये, यासाठी मिलियनेअर टॉवरच्या मागे, एस.व्ही. रोड, अंधेरी पश्चिम आणि वीरा देसाई रोड व जीवननगर दरम्यान ३ हजार क्युबिक मीटर क्षमतेचे तीन ठिकाणी प्रत्येकी दोन असे एकूण सहा पंप बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या कामाचा अंदाजित खर्च ५.७७ कोटी रुपये इतका आहे.