शिवडी ते न्हावा हा २२ किमी लांबीचा सहापदरी पूल असून याची समुद्रातील लांबी १६.५ किमी, तर जमिनीवरील ५.५ किमी आहे. पुलाला शिवडी, शिवाजीनगर (उलवे) व राष्ट्रीय महामार्ग ४-ब येथे चिर्ले गावाजवळ आंतरबदल आहे.
या सागरी सेतूच्या निमित्ताने ऑर्थोट्रोपिक स्टील डेक (ओएसडी) तंत्रज्ञानाचा भारतात पहिल्यांदाच वापर झाला आहे. असे ८४ हजार टन वजनी ७० डेक येथे बसविण्यात आले आहेत. त्यांचे एकूण वजन सुमारे ५०० बोइंग विमानाच्या वजनाइतके आहे. सुमारे १७ आयफेल टॉवर वजनाइतक्या म्हणजेच १७ हजार मेट्रिक टन वजनाच्या सळ्यांचा वापर यात करण्यात आला आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या पाच पट म्हणजेच सुमारे ४८ हजार किमी लांबीच्या वायरचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. ‘स्टेच्यू ऑफ लिबर्टी’ पुतळा उभारण्यासाठी जेवढे काँक्रीट लागले, त्याच्या सहापट म्हणजेच नऊ हजार ७५ घन मीटर काँक्रिटचा वापर हा सागरी सेतू उभा करण्यासाठी झाला आहे.
तब्बल १६ किमी लांबीचा रस्ता समुद्रावर असल्याने भरतीच्या वेळी यामध्ये भीषण कंपने होण्याची शक्यता आहे. या कंपनांचा परिणाम होऊ नये यासाठी पुलाचे बांधकाम करताना ३५ किमी लांबीच्या विशिष्ट ‘पाइल लायनर्स’चा वावर करण्यात आला आहे. हे लायनर्स जगप्रसिद्ध बूर्ज खलिफाच्या ३५ पट उंचीइतके आहेत, हे विशेष.
असे असतील फायदे
– नवी मुंबई व रायगड प्रदेशाचा विकास
– नियोजित नवी मुंबई विमानतळाशी जलद दळणवळण
– मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला जलद दळणवळण
– मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर १५ किमीने कमी होऊन प्रवास वेळेत १५ मिनिटांची बचत