परिस्थिती नाजूक असली तरी बायको माधवीची स्वप्न मोठी होती. पोलीस बनण्याचं स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगलं होतं. त्यादृष्टीने तिने काही वर्षे तयारी केली. त्यासाठी नवऱ्याचा तिला पूर्ण पाठिंबा होता. चहाच्या टपरीवर घर चालत नाही, शिक्षण कसं होणार? या विचाराने माधवीने शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली.
विद्यार्थ्यांची शिकवणी संपली की माधवी गोळाफेक-धावणे तसेच इतर शारिरिक व्यायाम आणि कसरती करत असे. माधवीने पोलीस भरतीची खूप चांगली तयारी केली. लेखी परीक्षेचा अभ्यासही मन लावून केला. माधवीची मोठी नणंद पोलीस दलात जमादार असून रुक्मिणी पाचपिंडे असं त्यांचं नाव आहे. त्यांचंही मार्गदर्शन माधवीला लाभलं.
माधवीची मुंबई पोलीस दलात पोलिस आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली आहे. लवकरच ती प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. मात्र एका चहावाल्याच्या पत्नीने आपल्या मनातील जिद्द आणि चिकाटीने आपलं स्वप्न पूर्ण केल्याने परिसरात माधवीची चर्चा होत आहे. आपल्या बायकोने केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं तिचे यजमान सांगतात. केज पोलिसांना देखील माधवीचं कौतुक वाटतं. कारण त्याच चहाच्या गाड्यावर बसून तिने काही काळ अभ्यास केलं. तिथे पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं. माधवीच्या पोलीस दलातील निवडीची बातमी आल्यानंतर केज पोलिसांनी तिचा सन्मान करुन तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.