• Sat. Sep 21st, 2024
चोरीचे पाणी वापरणाऱ्यांवर मेहरबानी का! टंचाईग्रस्त नागरिकांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पाणीटंचाईवरून मजीप्रा कार्यालयावर मोर्चे धडकत असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. त्याच वेळी शहराच्या वेशीवरून जाणाऱ्या अंबरनाथ ते काटई मार्गावर वाहने धुणारी सर्विस सेंटर तसेच धाबे चालकांना मात्र पाणीटंचाईची कुठली झळ बसत नसून त्यांना एमआयडीसीच्या वाहिन्यांतून विनाशुल्क २४ तास मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या नावावर नागरिकांवर पाणीकपात लागू करणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून चोरीचे पाणी वापरणाऱ्यांवर मेहरबानी का, असा संतप्त सवाल टंचाईग्रस्त नागरिक उपस्थित करत आहेत.अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांचे विस्तारीकरण आणि नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणीही वाढत आहे. लोकप्रतिनिधींकडून वाढीव पाणीपुरवठा योजनांच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र योजना अस्तित्वात येण्यास बराच अवधी लागणार असल्याने नागरिकांना बारमाही पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत असून दर उन्हाळ्यात यात भर पडते. या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील उन्हाळ्यातील पाणीसाठा पाहता मजीप्रा आणि एमआयडीसीकडून पाणीकपात केली जात आहे. तसेचखालवणाऱ्या पाणीसाठ्याचे कारण देत यंत्रणाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

जिथे कधी भांडी घासली, आज त्याच रेस्टॉरंटची मालकीण झाली; १८ वर्षीय तरुणीची थक्क करणारी कहाणी
दुसारीकडे अंबरनाथ ते काटई मार्गाला लागून जाणाऱ्या आणि एमएमआर क्षेत्रात विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिन्यांतून रोज हजारो लिटर पाणी चोरले जात आहे. या जलवाहिन्यांशेजारी अनधिकृतपणे सुरू असलेल्या वाहने धुणारी सर्व्हिस सेंटर तसेच याच मार्गावरील शेकडो धाबे चालकांकडून बिनदिक्कत अनधिकृतपणे मुख्य वहिनीतून जोडण्या घेत हजारो लिटर पाणी नियमित वापरले जात आहे. त्यामुळे एकीकडे नियमित बिल अदा करणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईचे कारण देत पाणीकपात करण्यात येत आहे. त्याच वेळी एमआयडीसीच्या जलवाहिन्यांतून विनाशुल्क मुबलक चोरीचे पाणी वापरणाऱ्यांवर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हितसंबंधातून कारवाईकडे दुर्लक्ष?

या मार्गावरील सर्व्हिस सेंटर आणि धाबे चालक अनधिकृत नळजोडण्या घेत विनाशुल्क पाणी वापरत असल्याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना कल्पना आहे. वृत्तपत्रातील बातम्यानंतर किरकोळ कारवाईचा देखावा केला जात असला तरी धाबे चालकांसोबत असलेल्या हितसंबंधातून कायमस्वरूपी कारवाई करण्याबाबत मात्र अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed