राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचे मागील वर्षी दिनांक १८ मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. या कुटुंबात त्यांचे पती शंकर खाडे यांच्यासह त्यांची तीन मुले, विष्णू, राजेंद्र आणि छगन तसेच विवाहित मुलगी आशा असे त्यांचे कुटुंब आहे.
राधाबाई यांच्या निधनानंतर एक महिन्यातच या तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत ताईची स्मृती कायम असाव्यात असे काहीतरी करू असा विचार करून आपल्या जागेमध्ये आईचे भव्य मंदिर बांधण्याचा निश्चय केला. केवळ निश्चय करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी तातडीने मंदिराचे काम सुरू केले. १० बाय १३ च्या जागेत या मंदिराचे उभारणीचे काम सुरू झाले. सहा महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक, सजीव वाटावी अशा प्रकारची मूर्ती बसवण्याचे ठरवले.
मूर्तिकाराचा शोध सुरू केल्यानंतर पुण्यातील कातोरे या मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकाराची माहिती त्यांना मिळाली. तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती सांगितल्यानंतर ते देखील ही मूर्ती बनवण्यास तयार झाले. तब्बल चार ते पाच महिने या मूर्तीवर काम करून त्यांनी अतिशय आकर्षक व पाहता क्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली. पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली. या मंदिरासाठी व मूर्तीसाठी सर्व मिळून तब्बल नऊ लक्ष रुपये खर्च आला आहे.
दिनांक १८ मे २०२२ रोजी राधाबाई खाडे यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या मुलांनी राजेंद्र, विष्णू व छगन यांनी एक वर्षाच्या आत आपल्या आईचे मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण करायचा असा निश्चय केला होता. त्यानुसार आता त्यांचा संकल्प पूर्ण झाला असून येत्या दोन दिवसांमध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना या मंदिरात केली जाणार आहे. अशा प्रकारचे आपल्या स्वतःच्या आईचे या पंचक्रोशीतील हे एकमेव भव्य असे असणार आहे.
आई म्हणजे प्रत्येकासाठीच सर्वस्व असते. जगातील कोणताही देव किंवा व्यक्ती ही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. सर्वात मोठे देवत्व हे आईमध्येच सामावलेले आहे. त्यामुळे आम्ही आईचे मंदिरच बांधण्याचा निर्धार केला व आईच्या आशीर्वादानेच आमचा हा संकल्प आता पूर्ण झाला आहे, असे मुलगा राजेंद्र खाडे यांनी म्हटले आहे.