टिटवाळा पूर्व भागात वास्तव्यास असलेले संदीप (तक्रारदाराचे नाव बदलले आहे) मुंबईतील विक्रोळी येथील कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांना यूकेमध्ये हॉटेल सुपरवायझरच्या नोकरीबाबत ईमेल आला. प्रत्येक महिन्याला ५ हजार ५०० पौंड पगार मिळण्यासह केवळ सहा तास काम असेल. एका वर्षात सहा आठवडे सुट्टी मिळेल. सुट्टीचा अतिरिक्त पगारदेखील दिला जाईल, असे त्यांना आमिष दाखवण्यात आले. सहा किंवा बारा महिन्यानंतर पगार वाढण्याविषयी सांगितले होते. या आमिषाला बळी पडत संदीप यांनी या नोकरीसाठी होकार दर्शवला. नंतर त्यांच्याकडून व्हिसा अर्जाच्या फीसाठी २७ हजार ७०० रुपये उकळले. तीन वर्षाच्या वर्क परमिट व्हिसासाठीदेखील त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आरोपींनी विविध कारणांखाली पैसे उकळूनही सायबर गुन्हेगारांकडून ईमेलद्वारे संदीप यांच्याकडे पैशांची मागणी चालूच होती.
या प्रकाराविषयी संशय आल्यानंतर संदीप यांनी नोकरी नको असल्याचे ईमेलद्वारे कळवले. शिवाय, त्यांनी पैशाची मागणी केली. मात्र, त्यांना ना नोकरी मिळाली, त्यांनी नोकरीसाठी दिलेले पैसे मिळाले. उलट आरोपींनी त्यांच्याकडेच पुन्हा पैशाची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदीप यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. संदीप यांची जवळपास १० लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक झाली असून ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.