म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई भाजपने मिशन १५०ची घोषणा केली आहे. महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची विशेष बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवताना, आगामी निवडणुकीत ठाकरे गट ५० जागाही गाठू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.मुंबई भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयात पार पडलेल्या सर्व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आशिष शेलार यांनी भाजपच्या मिशनची माहिती दिली. यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी आशिष शेलार म्हणाले, ‘१९९७ साली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे १०३ नगरसेवक होते. १९९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७वर आला. त्यानंतर ते ८४वर आले. २०१२मध्ये तर ही संख्या ७५वर पोहोचली. तर २०१७मध्ये ८४ नगरसेवक निवडून आले. आमच्या सरकारमध्ये सहभागी असल्याने त्यांना यश मिळाले. राज्यात सरकारमध्ये नसते, तर हा आकडा ६०वर आला असता. आज मी तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धव गट मुंबई महापालिका निवडणुकीत ५०चा आकडाही पार करू शकणार नाही. भूतकाळातील आकडेवारी ही त्याचा पुरावा आहे.’ मुंबईकरांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाकारले, असेही त्यांनी नमूद केले. तर याचवेळी शेलार यांनी, इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची सूचना भाजप नेत्यांना करतानाच, मुंबईत पक्षवाढीसाठी इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात सामील करण्याची सूचनाही केली.
पंतप्रधानांच्या योजना जनसामन्यांपर्यंत पोहचवा
शेलार म्हणाले, ‘आपल्याला जनमानसात जाऊन काम करणे, मोदी यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, लाभार्थ्यांशी संपर्क साधणे, ‘नौ साल बेमिसाल’ या मोदीजींच्या जनसंपर्क अभियानात केंद्र सरकारचे सर्व विषय पोहोचवणे गरजेचे आहे. केवळ मतदारांच्या अधिकारांसाठी नाही, तर प्राणीमात्रांच्या जगण्याच्या अधिकारांसाठीसुद्धा तुम्हाला आणि मला लढावं लागेल.’
Aaditya Thackeray : राजीनामा देतो फक्त एक काम करा, आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवारांचं आव्हान स्वीकारत चॅलेंज
राज ठाकरे लक्ष्य
‘तुम्ही आमच्यावर वैयक्तिक टीका केली, तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही. पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांवर टीका केली, तर तुमच्या विरोधात बोलायला कचरणार नाही’, असा इशारा आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला. ‘मोदीजी जे करतात, ते प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात त्याला जगण्याचे बळ मिळावे यासाठी असते’, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.