चलनातून दोन हजार रुपयांची नोट बाद करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावरही राऊत यांनी टीका केली. पहिली आणि दुसरी नोटाबंदी फसली. दोन हजार रुपयांच्या नोटा तुम्हीच आणल्या आहेत ना, असा प्रश्न करून एक हजार रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनात होत्या, यामुळे किती भ्रष्टाचार, दहशतवाद कमी झाला असा प्रश्न आहे. त्यावेळी नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या शाखांसमोर उभी असलेली साडेतीनशे लोक रांगेत मेली, असा आरोप राऊत यांनी केला. हा सदोष मनुष्यवध असून, याचे प्रायश्चित सत्ताधारी भाजप प्रायश्चित घेणार आहे काय असा प्रश्नही त्यांनी केला.
राऊत हेच खरे गुन्हेगार…
ठाकरे गटाचे खा. संजय राऊत हेच खरे गुन्हेगार आहेत, असा पलटवार शिवसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी केला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार असल्याची राऊत यांची टीका निरर्थक असून, कोश्यारी यांना गुन्हेगार ठरविणारे संजय राऊत कोण आहेत, असा प्रश्न शिरसाट यांनी केला. कोश्यारी यांना महाराष्ट्राचे गुन्हेगार ठरविण्याचा राऊत यांना अधिकार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे गटाचा खरा गुन्हेगार संजय राऊत हेच आहेत. म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला बसण्याची संधी देता कामा नये, असेही ते म्हणाले. कर्नाटकात अनेक वर्षानंतर काँग्रेसला विजय मिळाला. यामुळे काँग्रेसचे प्रदेसाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसतात. परंतु अनेक राज्यांत काँग्रेसची अवस्था वाईट आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा पंतप्रधान होईल हे पटोले यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले. दोन्ही काँग्रेसचे नेते राऊत यांना कधीच गांभीर्याने घेत नाहीत. मात्र ठाकरे गटाला राज्यातील सत्ताकारणातून हद्दपार करण्याचे काम राऊत करीत असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.