• Sat. Sep 21st, 2024
सुधीर सुर्यवंशी यांचा छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने गौरव

पुणे : नामवंत पत्रकार आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर लिहिलेल्या ‘चेकमेट’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक सुधीर सुर्यवंशी यांचा छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने गौरव करण्यात आला. संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी किल्ले पुरंदर येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुर्यवंशी यांचा सन्मान केला. संभाजी ब्रिगेडने भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं.स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले पुरंदर येथे रविवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. प्रसिद्ध अभिनेता हास्यजत्रा फेम गौरव मोरे, लेखक केतन पुरी, अभिषेक कुंभार, पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याबरोबरच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पुणे शहर गुन्हे शाखा उपायुक्त अमोल झेंडे यांना छत्रपती संभाजी महाराज विशेष गौरव सन्मान देण्यात आला. तसेच उद्योजकांना देखील ‘स्टार्टअप’साठी सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक सतीश किंद्रे, युवा उद्योजक सागर पाटील, दीपक दिघे, रिजवान पानसरे, अक्षय जगताप, अलका बडदे यांना सन्मानित करण्यात आले.

या सन्मान सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजित करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता महाराजांचा पाळणा, साडेनऊ वाजता राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलशाचा कार्यक्रम, सकाळी दहा वाजता शस्त्रास्त्रे व शिवकालीन नाणी प्रदर्शन तसेच मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, पावणे अकरा वाजता निलेश जगताप यांचे व्याख्यान आणि १२ वाजता मुख्य कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे संयोजन अजयसिंह सावंत, सागरनाना जगताप, संतोष हगवणे, संदिप जगताप आदींसह संभाजी ब्रिगेड तसेच महाराष्ट्र शासन आणि सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed