• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यात परवानगीविना उभारले होर्डिंग; मालकांना नोटिसा देण्याची जिल्हा परिषदेची कारवाई सुरू

    पुण्यात परवानगीविना उभारले होर्डिंग; मालकांना नोटिसा देण्याची जिल्हा परिषदेची कारवाई सुरू

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यासह रावेत येथे झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर, पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यांत १,४४० एवढे होर्डिंग उभारले असले, तरी त्यापैकी १,३७० होर्डिंग विनापरवानगी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यात १,२३० होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले नाही. सुमारे एक हजार होर्डिंग विनापरवाना उभारल्याने त्यांच्या मालकांना नोटिसा देण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे.ग्रामीण भागात परवाना घेतलेल्या सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्यासह ऑडिट न झालेल्या होर्डिंग मालकास नोटीस देऊन होर्डिंग तत्काळ काढून टाकण्याची; तसेच सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर तातडीने कारवाई करण्याची सूचना जिल्हा परिषदेसह तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांसह तहसिलदारांनी जिल्हा परिषदेला कारवाईचा अहवाल दिला आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

    Pune Accident: अष्टविनायकला जाताना पुण्यात खासगी बसचा भीषण अपघात; ५ जखमी
    २७ होर्डिंगनाच परवानगी

    पुणे जिल्ह्यात १३ तालुक्यांतील ग्रामपंचायत क्षेत्रातील एकूण १,४४० होर्डिंग आहेत. जिल्ह्यात केवळ २७ होर्डिंग परवानगी घेऊन उभारण्यात आले आहेत. १,३७० होर्डिंग आता विनापरवानगी उभारले असून, आतापर्यंत २३ होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले आहे. जिल्ह्यात उभारलेल्या होर्डिंगपैकी १,२३० होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेला मिळालेल्या अहवालात देण्यात आली आहे. जिल्ह्यात उभारलेल्या एकूण होर्डिंगपैकी ८७ होर्डिंग धोकादायक असल्याचे समोर आले आहे. कारवाईच्या भीतीने २७ होर्डिंग काढून टाकण्यात आले आहेत.

    पुणे जिल्हा परिषदेने होर्डिंगबाबत धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अभ्यास झाला असून, लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे. धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपासणी मोहीम राबवली.

    – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


    होर्डिंगवर कारवाई काय?

    – जिल्ह्यातील विनापरवाना उभारलेल्या एकूण १,३७० होर्डिंगपैकी सुमारे एक हजार होर्डिंगच्या मालकांना नोटिसा देण्याची कारवाई केली आहे.

    – ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ न झालेल्या ८२५; तसेच धोकादायक असलेल्या ४१ होर्डिंगच्या मालकांनाही नोटिसा देण्याची कारवाई प्रशासनाने केली आहे.

    ‘तात्पुरत्या होर्डिंगची यादी तयार’

    याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यात होर्डिंगच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’बाबत तपासणी मोहीम राबवली होती. त्यावर कायमस्वरूपी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे, की नाही, याची विचारणा करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात येणाऱ्या होर्डिंगची यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे. मान्सूनपूर्व तयारी सुरू केली असून, त्यात धोकादायक होर्डिंग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेने याबाबत धोरणाचे परिपत्रक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात होर्डिंगची नियमावली, ग्रामपंचायतीच्या जबाबदारी यांसारख्या विविध गोष्टींची रूपरेषा परिपत्रकात असणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed