• Mon. Nov 11th, 2024

    आरोग्य सेवेचा ‘साखळी’ विस्तार; पुण्यात गेल्या अडीच वर्षांत १०६ रुग्णालयांची नव्याने नोंदणी

    आरोग्य सेवेचा ‘साखळी’ विस्तार; पुण्यात गेल्या अडीच वर्षांत  १०६ रुग्णालयांची नव्याने नोंदणी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढते शहरीकरण आणि करोनासारख्या आजारांमुळे सरकारी वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडत असताना दुसरीकडे शहरात देशातील नामवंत रुग्णालयांच्या शाखा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. साखळी व्यवस्था असलेली यातील बहुतांश रुग्णालये कॉर्पोरेट आहेत. शहरात गेल्या अडीच वर्षांत १०६ रुग्णालये सुरू झाली आहेत. या रुग्णालयांमधून २१८१ खाटा उपलब्ध झाल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी रुग्णालये उभी राहत असल्याने पुण्याच्या वैद्यकीय व्यवस्थेचे क्षितिज विस्तारत असल्याचे दिसते. करोना नंतर देशातील नामवंत रुग्णालयांच्या शाखा शहरात सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात कॉर्पोरेट रुग्णालयांबरोबरच लहान आणि मध्यम स्वरूपाची रुग्णालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार मिळणे शक्य झाले आहे.

    शहरात नव्याने सुरू होणाऱ्या रुग्णालयांमध्ये प्रसूती, बालरोग, अस्थिरोग, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया; तसेच एखाद्या विशिष्ट आजारावर उपचार देण्यावर भर असल्याचे दिसून येत आहे. शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात उपचार घेण्यासाठी परदेशातूनदेखील नागरिक येतात.

    लोकसंख्येच्या तुलनेत शहरात कमी खाटा उपलब्ध असल्याचे करोना काळात दिसून आले आहे. शहरात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आहे. लोकसंख्यादेखील वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांची संख्या कमी असल्याचे देशातील कॉर्पोरेट रुग्णालयांच्या निदर्शनास आल्याने गेल्या काही वर्षांत या रुग्णालयांच्या शाखा सुरू होत असल्याचे दिसते.

    – डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा

    धावत्या कारचा टायर फुटला, वाहनावरील ताबा सुटला; भीषण अपघातात साताऱ्यातील युवा उद्योजकाचा अंत
    राज्यात मुंबईनंतर पुणे शहरात सर्व आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. या सर्व बाबींचा विचार करून शहरात रुग्णालयांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. मात्र, लोकसंख्या वाढ लक्षात घेता शहरात किमान २५ ते ३० हजार खाटा आवश्यक असल्याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखाने दहा वर्षांपूर्वी शहरातील रुग्णालय आणि खाटांची संख्या यावर एक सर्वेक्षण केले होते. त्या वेळी शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती आणि साडेपाच हजार खाटा उपलब्ध असल्याचे समोर आले होते.

    महापालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, ‘आरोग्य विभागाकडे गेल्या अडीच वर्षांत नव्याने नोंदणी झालेल्या १०६ रुग्णालयांमध्ये लहान, मोठ्या सर्व प्रकारच्या रुग्णालयांच्या समावेश आहे. ‘

    खासगी रुग्णालय वाढण्याची कारणे

    – शहराचा वाढलेला विस्तार

    – तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता

    – शहरात वाढलेले वैद्यकीय पर्यटन

    – पायाभूत सोयीसुविधा

    – उपलब्ध मनुष्यबळ

    गेल्या काही वर्षांतील आकडेवारी

    वर्ष – नवीन रुग्णालये – खाटांची संख्या

    २०२१-२२ – ४५ – ७१७

    २०२२-२३ – ५३ – १३६६

    २०२३-२४ – ८ – ९८

    शहरातील एकूण रुग्णालये – ७८०

    एकूण खाटा – १८, ९००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed