• Mon. Nov 25th, 2024

    तुमसर तालुक्यात ८ कोटींचा धान घोटाळा उघड; २ संस्थांच्या अध्यक्षांसह २६ जणांवर गुन्हे दाखल

    तुमसर तालुक्यात ८ कोटींचा धान घोटाळा उघड; २ संस्थांच्या अध्यक्षांसह २६ जणांवर गुन्हे दाखल

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : धानाची खरेदी न करताच कागदोपत्री धान खरेदी केल्याचे दाखवून सुमारे ८ कोटींचा धान घोटाळा करणाऱ्या दोन संस्थांच्या अध्यक्षांसह संचालकांविरुद्ध सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात सतत होणाऱ्या धान घोटाळ्यावरून शासनाचे पारदर्शी धोरण फोल ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.काय आहे प्रकरण?

    तुमसर तालुक्यातील बपेरा येथील अन्नपूर्णा सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था आणि वाहणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत हा घोटाळा झालेला आहे. बपेरा येथील अन्नपूर्णा सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था ही २०१५पासून धान खरेदी केंद्राचे काम करीत आहे. या संस्थेचे अध्यक्ष हिराचंद साखरे, संचालक शिवराम रहांगडाले, प्रशांत माटे, जसवंत पटले, जगदीश बानेवार, मुकेश अग्रवाल, मनोहर मानकर, किशोर उचिबगले, संजय बडवाईक, आशिषकुमार अग्रवाल, भारती आशिषकुमार अग्रवाल, सुनीता नियाते व ग्रेडर धर्मेंद्र सुखदास कोचे यांनी हंगाम २०२१ ते २०२२ मध्ये प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तावेज तयार करून शासन आणि शेतकऱ्यांची ६ कोटी ७५ लाख ७४ हजार २५२ रुपयांनी फसवणूक केली.

    कुंपणानेच शेत खाल्ले! धाराशिवमधील सर्वात मोठ्या बँकेत महाघोटाळा, कोट्यवधींचा अपहार, फसवणूक
    त्याचप्रमाणे वाहणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव ढबाले, उपाध्यक्ष किशोर शेंडे, संचालक महादेव उमरकर, सुभाष चामट, बंडू तिजारे, सहराम तिजारे, रामदास ढबाले, शंकपाल गोमासे, जयेंद्र मेश्राम, लक्ष्मीकांत बानेवार, राधिका ढबाले, शीला ढबाले व ग्रेडर राजेंद्र ढबाले यांनी खरीप हंगाम २०२१ ते २०२२ मध्ये प्रत्यक्ष धानाची खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तावेज तयार करुन १ कोटी ४७ लाख ४१ हजार ८०० रुपयांचा शासकीय अपहार केला. प्रभारी जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed