म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक करवाई केली पाहिजे. त्यांचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले पाहिजे. देशाच्या सुरक्षेबद्दल कोणी चुकीचे काम करीत असेल, तर त्याला माफी नाही, असा संदेश जाणे आवश्यक आहे. कुरूलकर कोणाशी संबंधित होते याची चौकशी खोलवर जाऊन केली पाहिजे,’ असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पवार पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, ‘अंगाशी आले की काही लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात असे सध्या दिसून येत आहे. कुरूलकर यांनी जे काही केले तो देशद्रोह आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक जेव्हा समीर वानखेडे यांच्या बाबत बोलत होते. तेव्हा काही लोक वानखेडे यांची बाजू घेत होते. जे नबाब मलिक बोलत होते. तेच आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. त्या वेळी वानखेडे यांचे समर्थन करणारे आज कुठे गेले? राजकारण करण्याऱ्यांनी राजकारण करावे, मात्र, जाणीवपूर्वक एखाद्याला पुरावा नसताना टार्गेट करू नये.’
राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच महापालिका निवडणुकांना विलंब होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर पवार म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होऊन लोकप्रतिनिधींचे राज्य यावे. आज सव्वा वर्ष झाले. लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही. लोकांना प्रतिनिधित्व मिळून देण्यासाठी न्यायालयात गेले तर बिघडले कुठे?’

‘आघाडीचा पोपट मेलेला नाही’
‘महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे,’ अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘पोपट मेलेला दाखवा तरी कुठे मेला आहे? महाविकास आघाडीमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळाव्यात या बाबतचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. एकत्र बसून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामंजस्यांने मार्ग काढण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.’