महत्वाची बाब म्हणजे, या अपघातात मृत्यू झालेले मनोज भावसार हे पुणे थेरगाव रुग्णालयात वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. तर, त्यांच्या पत्नी डॉ. शैलजा भावसार या महापालिकेत जेष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
पुणे येथील मनोज भावसार हे आपली कार (एमएच १४ इसी ८३५५) घेऊन तुळशी ते खेड भरणे असा मुंबई – गोवा महामार्गाने प्रवास करत होते. ते कोकणात एका कार्यक्रमासाठी निघाले होते. या दरम्यान, ते बोरघर येथील हॉटेल वैभव समोर आपली कार रस्त्याच्या बाजूला थांबवून गाडीच्या मागील डिक्कीतून काही सामान काढत होते. त्याचवेळी मुंबईकडून गोव्याला जाणाऱ्या एका भरधाव लक्झरी बसने (एमएच ०१ सीआर ३५३५) मनोज भावसार यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. बस चालक सुशांत सुखदेव सरकार (वय ४७, रा. अंधेरी ईस्ट मुंबई) याने आपले वाहन बेजबाबदारपणे चालवल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. अपघात झाल्याचं कळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात एवढा भीषण होता की, मनोज भावसार यांना बसने त्यांच्या कारसह लांबपर्यंत फरपटत नेले. त्यामुळे मनोज भावसार यांना गंभीर दुखापत झाली, तसेच त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत होऊन अनेक जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी लक्झरी चालक सुशांत सुखदेव सरकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.