धक्कादायक म्हणजे मोहन यांचे वडील, भाऊ आणि पुतण्या अशा तिघांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे बोरसे कुटुंबात टोकाचं पाऊल उचलणारे ते चौथे ठरले आहेत.
मोहन बोरसे हे शहर पोलिस दलाच्या मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. ते गुरुवारी रात्री आठ वाजता कर्तव्यावर हजर झाले. शुक्रवारी (दि. १९) पहाटे त्यांनी गळफास घेतल्याचे इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी सरकारवाडा पोलिसांत माहिती कळविली. बोरसे यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातून सुगावा लागलेला नाही. शवविच्छेदनानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बोरसे हे सन २००६ मध्ये मुंबई येथे पोलिस दलात चालक म्हणून नियुक्त झाले. सन २०२० मध्ये त्यांची आंतरजिल्हा बदली अंतर्गत नाशिक आयुक्तालयात बदली झाली होती.
तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक शिवराम भाऊराव निकम यांनी राहत्या घरात गळफास घेतला होता. आजारपणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. रजा संपवून कर्तव्यावर हजर होण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या केली होती. चार दिवसांत दोन आत्महत्यांमुळे शहर पोलिस दलातील मानसिक तणाव चर्चिला जात आहे.
बोरसेंच्या घरात चौघांच्या आत्महत्या
मोहन बोरसे यांचे वडील लक्ष्मण यांनीही आत्महत्या केली आहे. तर, त्यांच्या भावासह पुतण्यानेही आत्महत्या केली आहे. विविध कारणांतून त्यांच्या घरात आतापर्यंत चार आत्महत्या झाल्याचे पोलिस चौकशीत पुढे येत आहे. त्यामुळे कौटुंबिक कलह अथवा इतर काही कारणे आहेत का, याचा तपास सुरू आहे.