• Sat. Sep 21st, 2024

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी बॅड न्यूज; एका मिनिटात कोकण रेल्वे फुल्ल

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी बॅड न्यूज; एका मिनिटात कोकण रेल्वे फुल्ल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या (१९ सप्टेंबर) दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण झाले. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक उरलेले नाही.

गणपतीच्या दिवसांसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या हाच हजारो मुंबईकरांचा आधार असतो. १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी व अगदी काही मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वेगाड्यांकडे लागल्या आहेत. एका तपाहून अधिक काळ लोटल्यानंतरही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. खड्डेयुक्त खर्चिक रस्ते प्रवासापेक्षा स्वस्त रेल्वे प्रवासाला चाकरमान्यांची प्रथम पसंती असते. यामुळे हजारो कोकणवासी चार महिने आधीपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण खुले होण्याची वाट पाहत असतात.

लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी मत्स्यगंधा, नेत्रावती एक्स्प्रेसमधील शयनयान, तृतीय इकॉनॉमी, तृतीय आणि द्वितीय वातानुकूलित अशा सर्व श्रेणींतील आरक्षण पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी कोकणकन्या, मडगाव जनशताब्दी या प्रमुख रेल्वेगाड्यांचे प्रतीक्षा तिकीट देखील बंद करण्यात आले आहे. दादर-रत्नागिरी तुतारी एक्स्प्रेसमधील प्रतीक्षा यादी वाढल्याने तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसच्या चेअर कारसाठी १४१ प्रतीक्षायादी आहे. यामुळे चाकरमान्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

‘गणेशोत्सव आणि होळीसाठी कोकणात मोठ्या संख्येने प्रवासी जातात. तिकीट दलालांकडून मोठ्या संख्येने तिकिटांचे आरक्षण करून चढ्या दराने त्यांची विक्री करण्यात येते. यामुळे तिकिटांच्या आरक्षणाबाबत मध्य आणि कोकण रेल्वेने चौकशी करावी’, अशी मागणी प्रवासी सदाशिव सावंत यांनी केली आहे. ‘सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जातात. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन रेल्वे तिकीट दलाल सक्रिय होऊन प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करतात. याला आळा घालण्यासाठी १२० दिवस आधी आरक्षण सुरू करण्याचा नियम रद्द करण्यात यावा आणि १५ दिवस आधी आरक्षण सुरू करावे. त्याचबरोबर एकापेक्षा अधिक तिकिटे आरक्षित करणाऱ्या रेल्वे तिकीट दलालांवर नियंत्रण ठेवावे’, अशी देखील मागणी गजानन परब यांनी केली आहे.

तुमच्या गळ्यात बनावट रेल्वे तिकीट तर मारले नाही ना? मुंबईत तत्काळ तिकीट रॅकेटचा पर्दाफाश
खासगी बसवरच भिस्त

कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने आता चाकरमान्यांची भिस्त खासगी बसवर आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन यंदाची राजकीय नेत्यांकडून मिळाले आहे. प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत दलालांकडून खासगी बस कंपन्यांकडून दुप्पट-तिप्पट दराने तिकीट विक्री करण्यात येते. सरकारी यंत्रणा नियमावर बोट ठेवून तक्रार करा, मग कारवाई करू अशी भूमिका सरकारी यंत्रणा घेतात. वाढत्या इंधन दरांमुळे खासगी गाडीने प्रवास परवडत नाही. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जायचे कसे हा प्रश्न कोकणवासीयांना छळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed