• Sat. Sep 21st, 2024
सत्य दडवण्यासाठी समीर वानखेडेंनी NCB कार्यालयातील त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज करप्ट केलं?

मुंबई: कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआयच्या रडारवर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सीबीआयने या प्रकरणात समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांना चौकशीसाठीही बोलावले होते. परंतु, समीर वानखेडे चौकशीसाठी हजर न होता न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. आता न्यायालय समीर वानखेडे यांना दिलासा देणार की हे माहिती नाही. परंतु, समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या विभागीय संचालकपदी असताना अनेक बेकायदा गोष्टी केल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यामध्ये आर्यन खान एनसीबी कार्यालयात असतानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे म्हटले आहे. यामागे असलेल्या व्यक्तीचा थेटपणे उल्लेख नसला तरी ज्ञानेश्वर सिंह यांचा रोख समीर वानखेडे यांच्या दिशेनेच असल्याची चर्चा आहे.

Sameer Wankhede: आर्यन खान कोठडीत असताना माझं शाहरुख खानशी चॅटिंग झालं, समीर वानखेडेंची कबुली

ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष चौकशी पथकाने समीर वानखेडे यांची चौकशी केली होती. त्यानंतर ज्ञानेश्वर सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी आढळून आल्याचे निरीक्षण नोंदवले होते. या चौकशीसाठी आर्यन खान एनसीबी कार्यालयात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले होते. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार करण्यात आला. ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने मुंबई एनसीबी कार्यालयातील सीसीटीव्ही उपकरणे ताब्यात घेतली होती. मात्र, सीसीटीव्हीचा हा डेटा करप्ट झाला होता. याशिवाय, डीव्हीआर आणि मुंबई एनसीबीकडून देण्यात आलेली हार्ड डिस्क वेगवेगळी होती. मुंबई एनसीबी कार्यालयाची ही कृती पाहता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात, त्यामुळे त्या चौकशी समितीला देण्यात आल्या नसाव्यात, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याबाबतच्या संशयात भर पडली आहे.

Sameer Wankhede: एनसीबीच्या अहवालात समीर वानखेडे, क्रांती रेडकरबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

एनसीबीने धाड टाकली अन् अॅपल वॉच चोरीला

चौकशी समितीच्या अहवालात समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या एनसीबीच्या कारवायांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एनसीबीचे अधिकारी छापे मारताना कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय लोकांच्या मौल्यवान गोष्टी जप्त करतात. एनसीबीच्या एका अधिकाऱ्यावर छाप्याच्यावेळी अॅपल वॉच चोरल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर एनसीबीच्या छापेमारीवेळी संशयितांचे मोबाईल फोन जप्त करताना पंचनामा किंवा जप्तीचा मेमोही तयार केला जात नाही. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या अनेक वस्तूंची नोंद नसते, असे एनसीबीच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.

समीर वानखेडेंनी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी मागितल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed